अभिनेता वैभव मांगले आपल्याला अभिनेता म्हणून परिचित आहेच. या लॉकडाऊन काळात त्याच्यातला चित्रकारही अनेकांनी पाहिला. सहज छंद म्हणून यू ट्युबवर पाहात वैभवने चित्रं काढायला घेतली आणि एकेक करत तो चित्र काढू लागला. पुढे पुढे दिसेल त्या पृष्ठभागावर तो चित्र रेखाटू लागला. कागद, बोर्ड, लाकूड असं काहीही. त्याचा हा चित्रांचा सिलसिला असाच चालू आहे. ही चित्रं विकून त्यातून जमलेली रक्कम तो गरजू रंगकर्मींना देणार आहे. त्याच मोहिमेला आज सुरुवात झाली. त्याचं पहिलं चित्र घेतलं ते अभिनेत्री किशोरी गोडबोलेने.


रविवारी किशोरीच्या घरी वैभव तिला आवडलेलं एक चित्र घेऊन आला होता. यावेळी माझाशी बोलताना वैभव म्हणाला, 'मी खरंतर छंद म्हणून चित्र काढू लागलो. पण नंतर मला त्याचं व्यसन लागलं. मला एका अर्थाने ते मेडिटेशन वाटतं. मी काढलेली चित्र विकावीत असं सुचवलं तेही किशोरीनेच. मी माझी काढलेली चित्रं तिला दाखवत असतानाच तिने अत्यंत सौजन्याने ही चित्र विकणार असशील तर मला एक हवं असं सांगितलं. त्यातून मला ही कल्पना सुचली. आज साठ सत्तर चित्रं तयार आहेत. अनेकांनी संपर्क साधला आहे. लॉकडाऊनमुळे ही चित्रं देण्यात अडचणी आहेत. पण ती लवकरच दिली जातील.'

सलग तिसर्‍या दिवशी सीबीआयकडून रियाची चौकशी, गेल्या दोन दिवसांत तब्बल 17 तास चौकशी

किशोरीही वैभवच्या चित्रांमुळे खूपच खुश झाली. ती म्हणाली, 'वैभवने विलक्षण सुंदर चित्रं काढली आहेत. मी घेतलेलं चित्र निसर्ग चित्र आहे,. त्यातले रंग.. पानांच्या छटा.. हिरव्या भागावर पडलेली सूर्यकिरणं हे सगळं खूपच सुंदर वाटलं म्हणून मी ते चित्र घेतलं. माझी मुलगी सईलाही ते चित्र खूपच आवडलं. वैभवने रेखाटलेलं चित्रही मिळालं आणि आपण गरजवंतांना थोडी मदत करू शकलो याचा आनदं आहे. '

यावेळी योगिनी शेटे आणि निलेश शेटे या दाम्पत्यानेही एक चित्र घेतलं. ते मोराचं चित्र आहे. त्यांनीही वैभव मांगले यांना धन्यवाद दिले. लॉकडाऊन काळात प्रत्येकजण अडचणीत सापडला आहे. अशावेळी सकारात्मक ऊर्जा देणं ही प्राथमिकता आहे. मला चित्र काढताना जो आनंद गवसला तोच आनंद हे चित्र पाहणाऱ्यालाही मिळतोय याचं समाधान वाटत असल्याचं त्याने सांगितलं.

SSR Suicide Case | सुशांतची बहीण मीतू सिंहला सीबीआयचं समन्स