पंढरपूर : सध्या कोरोनाच्या संकट सगळीकडे वाढत आहे. या संकटांचा सामना करताना डॉक्टर्स, पोलिस, आरोग्य कर्मचारी, सरकारी यंत्रणेसह खांद्याला खांदा लावून काम करत आहेत त्या आशा वर्कर्स. ग्रामीण भागात तर आशा वर्कर्सवर कोरोना संकटाची पेलण्याची जबाबदारी खूप जास्त आहे.
मात्र या आशा वर्कर्सची मानधनाच्या बाबतीत मात्र उपेक्षा होत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या या संकटाचा सामना करताना गेले साडेपाच महिने रोज डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार घेऊन दिवसदिवस काम करावे लागत असताना आशा वर्कर्सच्या हाती पडतात रोज फक्त 33 रुपये. त्यामुळे आता मानधन वाढवून न मिळाल्यास आता कामबंद आंदोलन करावे लागेल असा इशारा आशा वर्कर्संनी दिला आहे. पंढरपुरातील वाखरी येथील कोविड केअर सेंटर येथील उदघाटन प्रसंगी या आशा वर्कर महिलांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना भेटून आपल्या व्यथा सांगितल्या.
आम्हालाही कुटुंब आहे, घरी लहान मुले आहेत, अशावेळी कुटुंबाची गरज म्हणून आम्ही दिवसभर आरोग्याचा सर्वे करत फिरत असतो. यात कोरोना पेशंट असतात, इतर आजारी पेशंट असतात, यामुळे आमच्या जीवालाही धोका असतो, असे सांगत एवढे करून महिन्याकाठी हातात केवळ 1500 रुपये मिळत आहेत. सध्याच्या काळात एवढ्या तुटपुंज्या मानधनावर आम्ही कसे जगायचे? असा सवाल या आशावर्कर्सनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना केला.
शेतात खुरपायला जाणाऱ्या महिलेला देखील 300 रुपये हजेरी मिळत असताना आम्ही जीव धोक्यात घालून काम करीत असताना किमान तेवढे तरी मानधन मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आता मात्र आमची घरची मंडळी देखील आम्हाला बोलू लागल्याने मानधन वाढवून न दिल्यास नाईलाजाने कामबंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे. येत्या अधिवेशनात याबाबत आपण प्रश्न मांडू असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले असले तरी आता मानधन न वाढवल्यास या महिला आंदोलन करायला लागल्यावर कोरोनाच्या धोक्यात रुग्णांची माहिती कोण गोळा करणार? याचे उत्तर सरकारला शोधावे लागेल.