मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेत्री हिना खान (Hina Khan Breast Cancer) सध्या स्तनांच्या कर्करोगाशी लढा देतेय. सध्या तिच्यावर उपचार चालू आहेत. काही महिन्यांपूर्वी तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समोर आले होते. या आजाराचे निदान होताच, तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना याबाबत सविस्तर सांगितलं होतं. दरम्यान, स्तनांचा कर्करोग झाल्याचे समजल्यापासून हिना खान वेळोवेळी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर तिच्यावर होत असलेल्या उपचाराबाबत माहिती देते. अशात तिने इन्स्टाग्रावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोकडे पाहून तिच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.
हिना खानने शेअर केला फोटो
हिना खानने 6 डिसेंबर रोजी तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हिना खान रुग्णांच्या कपड्यात दिसत आहे. खरं म्हणजे तिचा हा पाठमोरा फोटो आहे. या फोटोत तिचा चेहरा दिसत नाहीये. मात्र या फोटोकडे पाहून चाहत्यांनी तिला कमेंट्सच्या माध्यमातून धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
फोटोमध्ये नेमकं काय आहे?
हिना खानने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये एक प्लास्टिकची पिशवी आहे. दुसऱ्या हातात दोन प्लास्टिकच्या डब्यासारखे वैद्यकीय उपकरण दिसत आहे. प्लास्टिकची बॅग आणि दोन प्लास्टिकचे डबे घेऊन हिना खान रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जाताना दिसतेय. या फोटोसोबत तिने सकारात्मक, आशावादी कॅप्शन लिहिले आहे. उपचारांच्या कॉरिडॉरमधून मी आयुष्याच्या प्रकाशमय दिशेने जात आहे. एक एक पाऊल टाकत हा माझा प्रवास चालू आहे. मी कृतज्ञ आहे. माझ्या प्रार्थना करा, अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलंय.
अनेकांनी हिनासाठी केली प्रार्थना
विशेष म्हणजे हिनाचा हा फोटो पाहून सिनेसृष्टीतील अनेक बड्या चेहऱ्यांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांनी हिनाचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. तुला माझ्या अंत:करणातून खूप साऱ्या दुआ, असं अभिनेत्री अंकिता लोखंडेने म्हटलंय. तर अभिनेत्री तनाझ इराणीने देव तुझ्याच बाजूने उभा आहे. तो तुझ्यासोबत एक एक पाऊल टाकत आहे. तुझ्यासाठी खूप साऱ्या दुआ, असं म्हणत हिना खानचे मनोबल वाढवले आहे.
दरम्यान, हिना खान सध्या स्तनांच्या कर्करोगावर उपचार घेत असून मोठ्या हिमतीने ती या आजाराचा सामना करत आहे. तिच्यातील सकारात्मकता पाहून अनेकांनी तिची पाठ थोपटली आहे. हिना लवकरात लवकर या आजारातून बरी व्हावी, अशी भावना सर्वच स्तरांतून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!