Ashwini Kulkarni on Marathi Movie : चित्रपट आणि त्यामध्ये होणारं अभिनेत्रींचं चित्रण हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. कधी एखाद्या चित्रपटातील स्त्री पात्राचं कौतुक होतं, तर कधी त्या पात्राला टीकेचा सामना करावा लागतो. कधी अगदी बोल्ड, तर कधी अत्यंत सालस भूमिकांमध्ये अभिनेत्री झळकतात. नेमकं याचबाबत मराठमोळी अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिनं आपली मतं स्पष्ट केली आहेत. अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिनं नुकतंच मराठी इंडस्ट्रीबाबत एक थेट आणि स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. आणि तिचं हेच वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मराठी चित्रपटांमध्ये स्त्रियांना योग्य सादरीकरण मिळत नाही, असं अभिनेत्रीचं म्हणणं आहे. तसेच, प्रत्येकवेळी सई ताम्हणकरसारखी बिकिनी घालणं गरजेचं नाही. एक स्त्री साडीमध्येही हॉटच दिसते, असंही अभिनेत्री म्हणाली आहे.
मराठमोळी अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी (Ashwini Kulkarni) ने नुकतीच 'द पोस्टमन' या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने मराठी सिनेमा, मराठी इंडस्ट्रीबद्दल वक्तव्य केले आहे. मराठी सिनेमा का चालत नाहीत, मराठी इंडस्ट्रीमधील सिनेमे ब्लॉकबस्टर का ठरत नाहीत, मराठी सिनेमे सातत्याने फ्लॉफ का ठरत आहेत, अशा अनेक विषयांवर अभिनेत्रीनं आपलं परखड मत वक्तव्य केलं आहे. यासोबतच तिनं मराठी चित्रपटांमध्ये स्त्रियांना योग्य सादरीकरण मिळत नसल्याचंही म्हटलं आहे.
मुलाखतीत बोलताना अश्विनी कुलकर्णी म्हणाली की, "मराठी चित्रपटांमध्ये स्त्रियांना ज्या पद्धतीनं सादर करता आलं पाहिजे, तसं झालेलं नाही. 'नो एन्ट्री'मध्ये अंकुश चौधरीनं सई ताम्हणकरला चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केलं होतं, त्यानंतर फार काही विशेष पाहायला मिळालं नाही. वरण भात लोणचं...मध्ये मी एक सरप्राइज एलिमेंट होते. पण तरीही उंच, हॉट, बोल्ड बायकांना जेवढं उठून दिसायला हवं होतं ते नाही झालं."
पुढे बोलताना अश्विनी कुलकर्णी म्हणाली की, "मराठी चित्रपटांमध्ये एकतर स्त्रीला फारच सोशिक दाखवतात किंवा मग ती बंडखोर असते. पण स्त्रीचं सौंदर्य, आत्मविश्वास आणि विविध रूपं याकडे दुर्लक्ष केलं जातं. ऐश्वर्या रायचं उदाहरण घ्या PS-1 आणि PS-2 मध्ये ती राणी असूनही हॉट आणि सुंदर दिसते. धूम 2 मध्ये ती बोल्ड आहे. पण दोन्ही रूपं ताकदीची आहेत. मराठी निर्मात्यांना हे समजलेलं नाही."
अश्विनी कुलकर्णीनं मुलाखतीत बोलताना आपला मुद्दा आणखी स्पष्ट केला. ती म्हणाली की, "प्रत्येकवेळी सई ताम्हणकरसारखी बिकिनी घालणं गरजेचं नाही. एक स्त्री साडीमध्येही हॉटच दिसते. जर तिला तशी भूमिका आणि सादरीकरण मिळालं, तर... हेच बदल मराठी वेब सिरीजमध्ये थोडे थोडे दिसायला लागलेत आहे, जे सकारात्मक आहेत."
दरम्यान, मराठमोळी अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी 'वरण भात लोणचं कोण नाय कोणाचं', 'सौभाग्यवती सरपंच', 'पछाडलेला', 'व्हॅलेंटाईन्स डे' अशा वेगवेगळ्या चित्रपट आणि वेब सिरीजमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसून आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Chhaava OTT Release Date: कन्फर्म! 'छावा'ची ओटीटी रिलीज डेट जाहीर; कधी आणि कुठे पाहायला मिळणार?