Bela Bose : ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगणा बेला बोस (Bela Bose) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बेला यांनी साठ-सत्तरच्या दशकात अनेक गाजलेल्या सिनेमात काम केलं होतं. 200 पेक्षा अधिक सिनेमात त्यांनी काम केलं आहे. 'शिकार', 'जीने की राह' आणि 'जय संतोषी मॉं' हे त्यांचे सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले. त्या एक अभिनेत्री असण्यासोबत उत्कृष्ट नृत्यांगणादेखील होत्या. तसेच त्यांना लिखाणाचीदेखील आवड होती.
बेला बोस यांच्या संघर्षाची कहाणी... (Bela Bose Struggle Story)
बेला बोस यांच्या त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला आहे. कोलकात्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कापड व्यापारी होते. बेला लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी बेला यांच्या खांद्यावर आली. शिक्षण घेत असतानाच पैसे कमवण्यासाठी त्या सिनेमात काम करू लागल्या. शाळेत असतानाच त्या एका डान्स ग्रुपमध्ये सामील झाल्या आणि विविध ठिकाणी जाऊन कार्यक्रम करू लागल्या.
'सौतेला भाई' या सिनेमाच्या माध्यमातून बेला यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यांचा पहिला सिनेमा 1962 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सिनेमांसह त्यांनी अनेक बंगाली नाटकांमध्येदेखील काम केलं आहे. वयाच्या 17 व्या वर्षी अभिनयक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या बेला यांनी 200 पेक्षा अधिक सिनेमात आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
बेला 1967 मध्ये अभिनेता, निर्माता अशीश कुमारसोबत लग्नबंधनात अडकल्या. लग्नानंतर त्यांनी सिनेमात काम करणं कमी केलं. पण 1975 साली आलेल्या 'संतोषी मॉं' या सिनेमाने त्यांना रातोरात स्टार बनवलं. अनेक सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्यांनी स्वत:ची नृत्य अकादमीदेखील सुरू केली होती. बेला बोस या सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह होत्या. आता त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी आणि नातू असा परिवार आहे. बेला यांच्या निधनावर सेलिब्रिटींसह चाहते शोक व्यक्त करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :