Actress Namitha Temple Entry :  अभिनेत्री आणि भाजपच्या तामिळनाडूमधील नेत्या नमिता (Namitha) यांना धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. सोमवारी तामिळनाडूतील मदुराई येथील मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर आपल्याला हिंदू असल्याचा पुरावा देण्यास सांगण्यात आल्याचा आरोप अभिनेत्री आणि भाजप नेत्या नमिता (Actress Namitha) यांनी केला. मंदिराच्या अधिकाऱ्याने तिला मंदिरात जाण्यापासून रोखले आणि ती हिंदू असल्याचा पुरावा नमिताकडे मागितला असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. 


या प्रकरणावर नमिता यांनी सांगितले की, "पहिल्यांदाच, मला माझ्या स्वतःच्या देशात आणि माझ्या स्वतःच्या राज्यात मला स्वत:ला हिंदू म्हणून सिद्ध करण्यास सांगितले.  मला पुरावा मागितला याचे वाईट वाटले नाही, पण तो कशा पद्धतीने मागितला गेला, याचे अधिक वाईट वाटले. मंदिर प्रशासनाचा अधिकारी आणि त्याचा सहकारी आमच्याशी अतिशय उद्धट पद्धतीने वागले असल्याचा आरोप नमिता यांनी केला. 


तामिळनाडू राज्य भाजपच्या कार्यकारणी सदस्य असलेल्या नमिता यांनी सांगितले की,  मी हिंदू म्हणून जन्मले आहे. माझे लग्न तिरुपती येथे झाले आणि माझ्या मुलाचे नाव भगवान श्रीकृष्णाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. तरीही मंदिरातील कर्मचाऱ्यांनी आमच्याशी अतिशय उद्धटपणे वागले. माझी जात आणि देवावरील श्रद्धा सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावा मागितला असल्याचा आरोप नमिता यांनी केला. 


व्हिडीओ पोस्ट करून सांगितला प्रसंग...


नमिता यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. आम्ही 20 मिनिटे मंदिराबाहेर एका कोपऱ्यात उभे होतो. आमच्या या भेटीबद्दल स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली होती. तसेच आमच्या येण्यामुळे इतर भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही मास्क परिधान केला होता, असेही त्यांनी सांगितले. 






मंदिर प्रशासनाने काय सांगितले?


या प्रकरणावर बोलताना मंदिर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, नमिता आणि तिचे पती यांनी मास्क परिधान केला होता. त्यामुळे ते हिंदू आहेत का, याची चौकशी करण्यात आली. त्याशिवाय, त्यांना या मंदिराच्या परंपरेबद्दल, नियमांबाबतही सांगण्यात आले. 


मंदिर प्रशासनातील अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, नमिताशी याबाबत बोलल्यानंतर तिच्या कपाळी कुंकू लावण्यात आले आणि मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.