मुंबई : सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून (ED) बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. हे समन्स FEMA (Foreign Exchange Management Act) कायद्याच्या उल्लंघन केल्या संदर्भात मुंबईतल्या ईडी कार्यालयाने पाठवलं असल्याची माहिती आहे. यामी गौतमला 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होण्याबाबत ही नोटीस बजावली आहे.






माहितीनुसार यामी गौतमच्या बँक अकाऊंटमधून जवळपास दीड कोटींच्या परदेशी चलनाचा व्यवहार झाला आहे. यासंदर्भात तिनं अधिकाऱ्यांना सूचना दिली नसल्याचं समोर आलं आहे. यामीने केलेल्या व्यवहारात परदेशी चलनाच्या व्यवहारात अस्पष्टता आढळून आली आहे. यामीच्या बँक खात्यातील काही परदेशी व्यवहारात गोंधळ आढळून आला असल्याने यामीची चौकशी केली जाणार आहे. ईडीकडून यामीला ही दुसरी नोटीस आहे.


काही दिवसांपूर्वीचं झालं आहे लग्न


यामीनं काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक आदित्य धर सोबत लग्न केलं आहे. तीन दिवसांपूर्वीचं ती हनिमूनवरुन परत आली आहे. त्यानंतर ती 'ए थर्सडे' सिनेमाच्या शूटिंगसाठी रवाना झाली. या सिनेमात यामी नैना जायसवाल नावाच्या एका स्कूल टीचरची भूमिका साकारणार आहे. यामी गौतम 'फेअर एंड लवली' च्या जाहिरातींच्या माध्यमातून सर्वाधिक प्रसिद्ध झाली. तिनं उरी, काबिल, सनम रे, गिन्नी वेड्स सनी, विक्की डोनर, बाला, बदलापुर, टोटल सियापा अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे.