Kantara case Ranveer Singh: कांतारा चित्रपटातील पवित्र देवतेची नक्कल केल्यामुळे अभिनेता रणवीर सिंह हा प्रचंड ट्रोल झाला होता. त्याला देवतेची नक्कल करण्यावरुन प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. नेटकऱ्यांनी तसेच देवतेला मानणाऱ्यांनी अभिनेत्यावर टीकेचे तोफ डागली. याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी झाली. रणवीर सिंहनं या प्रकरणी माघार घेतली आहे. आपण म्हैसूरच्या चामुंडी हिल्सवर जाऊन देवतेची माफी मागणार, अशी ग्वाही देखील दिली. यामुळे या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय? (Ranveer Singh Kantara)
2025 साली गोव्यात (IFFI) चा सोहळा पार पडला होता. या सोहळ्यात रणवीर सिंह उपस्थित होता. त्यानं कांतारा चॅप्टर 1 या चित्रपटातील दैव परंपरेची तसेच अभिनेता ऋषभ शेट्टीची नक्कल केली. तसेच पवित्र देवतेचा उल्लेख त्यानं स्त्री भूत असा केला होता. त्यानं केलेल्या नक्कलनंतर अभिनेता रणवीर सिंह प्रचंड ट्रोल झाला. भारतासह कर्नाटकातील लोकांच्या हिंदू भावना दुखावल्या गेल्या.
व्हिडिओ व्हायरल होताच हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली. काहींनी अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली. बंगळूरुच्या हायग्राउंड्स पोलीस ठाण्यात रणवीर सिंहविरोधात तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला. अभिनेत्याविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं. न्यायालयामध्ये न्यायमुर्ती एम. नागप्रसन्ना यांनी अभिनेत्याला चांगलंच फटकारलं.
रणवीरच्या वतीने केस लढणारे वकील साजन पूवय्या यांनी न्यायालयात बाजू मांडली. रणवीरची बाजू सांगताना वकील म्हणाले, 'रणवीरला पश्चाताप होतो आहे. न्यायालयात अॅफिडेव्हिट सादर करणार आहोत. तसेच तो म्हैसूर येथील चामुंडी हिल्सवर जाऊन देवीचं दर्शन घेऊन माफी मागेल', असं वकील म्हणाले.
अभिनेता रणवीर सिंह सध्या धुरंधर 2मुळे चर्चेत आहे. त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजत आहे. दरम्यान, या प्रकरणात रणवीरची भूमिका समोर आल्याने त्याचं कौतुक होत आहे. दरम्यान, रणवीर सिंह माफी मागण्यासाठी मंदिरात कधी जाणार? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या या प्रकरणामुळे रणवीर सिंह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
