Pahalgam terror attack: पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या आगामी हिंदी चित्रपट 'अबीर गुलाल' मधील दोन गाणी युट्यूबवरून (youtube) काढून टाकण्यात आली आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर फवादचा आगामी चित्रपट 'अबीर गुलाल' वादात सापडला असल्याचं चित्र आहे. या चित्रपटात वाणी कपूर देखील आहे. मंगळवारी, 22 एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील पहलगाम या पर्यटन स्थळाजवळील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. ज्यामध्ये 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. त्यापैकी बहुतेक जण पर्यटक होते. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.

युट्यूब वरून गाणी हटवली

दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या वादामुळे चित्रपटातील पहिल्या गाण्याचा 'खुदाया इश्क'चा अधिकृत व्हिडिओ आता युट्यूब वरून हटवण्यात आला आहे. हे रोमँटिक गाणे अरिजित सिंग आणि शिल्पा राव यांनी गायले आहे. हे गाणं 14 एप्रिल रोजी सोशल मीडियावर रिलीज झालं होतं. तर दुसरं गाणं 'अंग्रेजी रंगासिया' 18 एप्रिल रोजी रिलीज झालं होतं. हे गाणं आता यूट्यूबवरही उपलब्ध नाही. हे गाण सोशल मिडियावरून हटवलं असलं तरी, गाण्याचे छोटे क्लिप अजूनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहेत. 'अबीर गुलाल' हा चित्रपट ए रिचर लेन्स एंटरटेनमेंट, इंडियन स्टोरीज प्रोडक्शन आणि अर्जय पिक्चर्स यांनी बनवला आहे. विवेक बी अग्रवाल, अवंतिका हरी आणि राकेश सिप्पी हे चित्रपटाचे निर्माते आहेत. 

चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी

मिळालेल्या माहितीनुसार, 'अबीर गुलाल' या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. 9 मे रोजी भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटावर बंदी घालण्याच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

एफडब्ल्यूआईसीई कडून कडक सूचना

बुधवारी, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) नेही पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याच्या आपल्या निर्देशांचा पुनरुच्चार केला आहे. एफडब्ल्यूआईसीई (FWICE) ने एका निवेदनात म्हटले आहे की, 'पहलगाममधील अलिकडच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, FWICE पुन्हा एकदा कोणत्याही भारतीय चित्रपट किंवा मनोरंजन प्रकल्पात सहभागी होणाऱ्या सर्व पाकिस्तानी कलाकार, गायक आणि तंत्रज्ञांवर बहिष्कार घालण्यास भाग पाडत आहे. 

पहलगाम हल्ल्याविषयी फवाद खानची पोस्ट

फवाद खान आणि वाणी दोघांनीही सोशल मीडियावर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला होता. फवादने दुःख व्यक्त करत म्हटलेले, 'पहलगाममधील भयानक हल्ल्याची बातमी ऐकून खूप दुःख झाले. या भयानक घटनेतील बळींसोबत आमचे विचार आणि प्रार्थना आहेत. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळो, ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो.