Abhijit Bichukale : लोकसभेचं (Lokasabha Election 2024) बिगुल वाजल्यानंतर अनेकांची निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु झाली आहे. कोणत्या मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार उभा राहणार याची उत्सुकता प्रत्येकालाच लागून राहिली आहे. ज्या साताऱ्यातून शरद पवारांनी 2019च्या विधानसभा निवडणुकांना हादरा बसवला होता, त्याच साताऱ्यातून लोकसभेला दोन दिग्गज नावं आहेत. त्यातच तिसरं नाव हे बहुचर्चित अभिजीत बिचुकलेंचंही (Abhijit Bichukale) आहे. 


भाजपकडून उदयनराजे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीनिवास पाटील यांच्यात लोकसभेची रणधुमाळी उडणार या चर्चा तर आहेतच. पण यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. अभिजीत बिचुकले हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच साताऱ्यातून ते लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. एबीपी माझासोबत बोलताना त्यांनी याबाबत सांगितलं. 


साताऱ्याच्या मतदारसंघातून बिचुकले रिंगणात उतरणार


सातारमधील राजकारणाला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून परंपरा आहे. त्यानंतर शरद पवार यांनीही नेतृत्व केलं आहे. मात्र, उदयनराजे भोसले भाजपत गेल्यानंतर तसेच आमदार जयकुमार गोरेंच्या माध्यमातून भाजपने सुद्धा शिरकाव केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यामधील आहेत. याच साताऱ्यातून अभिजीत बिचुकले लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान आता अभिजीत बिचुकलेंना किती मतं मिळणार हे पाहणं खरचं उत्सुकतेच असणार आहे. 


मला कुठल्याही पक्षात जाण्याची गरज नाही - अभिजीत बिचुकले


दरम्यान लोकसभा निवडणुकांविषयी एबीपी माझासोबत बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले की, लोकांनी मला मतदान करावं मी नक्कीच विकास करेन. मला कुठल्याही पक्षात जाण्याची गरज नाही. माझ्याकडेच अनेक लोक येणार आहे. मी कुठेही गेलो तरी अनेक लोक माझ्याजवळ येऊन फोटो, सेल्फी काढतात .मात्र मतदान का करत नाही हा प्रश्न मलाही पडतोय.


कसब्याच्या पोटनिवडणुकीत बिचुकलेंची एन्ट्री


कसबा पोटनिवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरु होती. याच निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंनी देखील एन्ट्री केली. या मतदारसंघात अभिजीत बिचुकलेंनी जोरदार प्रचार देखील केला होता. त्या निवडणुकीसाठी बिचुकलेंना कपाट हे चिन्ह मिळालं होतं. मतमोजणीवेळी पहिल्या फेरीत अभिजीत बिचुकलेंना फक्त 4 मतं मिळाली होती. त्यामुळे ही निवडणूक विशेष गाजली. आता लोकसभेच्या रिंगणात उतरल्यानंतर सातारकरांची मनं अभिजीत बिचुकले जिंकणार का हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Abhijit Bichukale :'डॉक्टर' अभिजीत बिचुकले! आर्ट आणि नाट्य क्षेत्रातील कार्यासाठी दिल्लीच्या विद्यापीठाने दिली पदवी