Abhijeet Kelkar Post On Atharva Sudame Video Controversy: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेला (Atharva Sudame) जोरदार ट्रोल करण्यात आलं आणि त्यासाठी कारण ठरलं, त्यानं गणेशोत्सवावर (Ganeshotsav)) तयार केलेला एक व्हिडीओ. अथर्व सुदामेनं हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश (Message of Hindu-Muslim unity) देणारा एक रिल तयार केलेला. पण यावरुन त्याला जोरदार ट्रोल केलं जाऊ लागलं. काहींनी अथर्वला खडे बोल सुनावले, तर काहींनी त्याची पाठराखण केली. अशातच आता मराठी अभिनेता अभिजीत केळकरनंही (Marathi Actor Abhijeet Kelkar) अथर्व सुदामेसाठी पोस्ट केली आहे. अभिनेत्यानं अथर्वची बाजू घेऊन त्याला ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे.
अभिजीत केळकर नेमकं काय म्हणाला?
बिग बॉस मराठीचा विनर अभिजीत केळकर म्हणाला की, "माझ्या देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, संरक्षणाची जबाबदारी सक्षमतेने पार पडणाऱ्या सोफिया कुरेशी, सनई वादक उस्ताद बिस्मिल्लाह खान, तबलानवाज उस्ताद अल्लारखा खान, झाकीर हुसेन, A R रेहमान, सानिया मिर्झा, महाराजांचं संरक्षण करणारे सैय्यद बंडा, तिन्ही खान, रफी साहेब, युसूफ खान, मधुबाला, नर्गिस, मीना कुमारी आणि असे अनंत... ह्यांच्याबद्दल आपल्या मनात प्रेम, आदर, अभिमान असेल आणि त्यांच्यावर प्रेम करताना त्यांचा धर्म कुठला हा विचार आपल्या मनातही येत नसेल..."
पुढे बोलताना अभिजीत केळकर म्हणाला की, "मला गरज पडली तर माझ्यासाठी ज्याने रक्तदान केलं, डॉक्टर म्हणून उपचार केले, जेवताना ते धान्य ज्याने पिकवलं तो कुठल्या धर्माचा, जातीचा आहे हे मला विचारावंसं ही वाटत नसेल तर मग आपण जिला बुद्धीची देवता मानतो अशा गणपती बाप्पाची मूर्ती कोणी घडवली आहे, त्या माणसाची जात, धर्म कुठला आहे ह्याचा मला का फरक पडावा? मी ब्राह्मण जातीत जन्माला आलो ह्यात माझं काहीही कर्तृत्व नाही, ना माझ्या आई वडिलांनी जात पात मानण्याचे संस्कार माझ्यावर केले...",
"सरकारी ठिकाणी, कागदपत्रांवर जात, धर्म लिहावा लागतो म्हणून नाईलाजाने मी तो लिहितो / लिहावा लागतो... जन्माने मिळालेला माझा हिंदू धर्म, जन्माने मला मिळालेली ब्राह्मण ही माझी जात, मला कुठलाही भेदभाव किंवा द्वेष करायला शिकवत नाही... उलट माझा हिंदू धर्म मला, वसुधैव कुटुंबकम हीच शिकवण देतो... हे असं असताना जर अथर्व सुदामे हाच संदेश आपल्या व्हिडिओतून देत असेल तर तो आपल्यातल्याच काही लोकांना का खटकावा?", असं अभिजीत केळकर म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :