Aamne Samne : खुसखुशीत मनोरंजनाची मेजवानी घेऊन आलेल्या ‘आमने सामने’ (Aamne Samne) या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं हे धमाल विनोदी नाटक रविवार  15 मे ला दुपारी 4.30 वा. गडकरी रंगायतन, ठाणे (Thane) येथे आपला शतक महोत्सवी आनंद सोहळा साजरा करणार आहे. तत्पूर्वी या नाटकाची एक छोटेखानी पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली. या परिषदेला अभिनेते मंगेश कदम,रोहन गुजर,अभिनेत्री लीना भागवत आणि निर्माते संतोष काणेकर उपस्थित होते. 


लेखनापासून ते वेशभूषेपर्यंत सगळ्याच बाबतीत वेगळेपणा जपणारं हे नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहचणं महत्त्वाचं असल्याचं मंगेश कदम यांनी यावेळी सांगितलं. दोन्ही पिढ्यांना आपलसं वाटेल असा या नाटकाचा विषय आहे. प्रत्येक प्रयोगादरम्यान नाटय रसिक आणि कलाकारांमधील होणाऱ्या मनमोकळया संवादातून आम्हाला त्याची पोचपावती मिळते आणि हेच नाटकाचं यश असल्याचं लीना भागवत यांनी यावेळी सांगितलं. व्यावसायिक नाटकाच्या पदार्पणात माझ्या पिढीचं नाटक करायला मिळालं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचे रोहन गुजर सांगतो. हे नाटक पाहिल्यानंतर घराघरांत संवाद सुरु होतोय, हीदेखील मोठी गोष्ट असल्याचे त्याने यावेळी नमूद केले. प्रत्येकाला विचार करायला प्रवृत्त करेल असं हे नाटक असल्याचं मत दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांनी मांडलं. ‘आमने सामने’ नाटकाचे अधिकाधिक प्रयोग करण्याचा मानस निर्माते संतोष काणेकर यांनी यावेळी व्यक्त केला.


विनोदी अंगानेसुद्धा अनेक महत्त्वाचे विषय मांडता येतात हे दाखवून देणाऱ्या ‘आमने सामने’ या नाटकातून लग्नसंस्थेवर मार्मिकरित्या भाष्य करण्यात आले आहे. मंगेश कदम, लीना भागवत, मधुरा देशपांडे, रोहन गुजर यांच्या अभिनयाने रंगलेल्या ‘आमने सामने’ या दोन अंकी नाटकात मागच्या पिढीने काळानुसार नव्याचा स्वीकार करायला हवा हा विचार रंजकरीत्या मांडला आहे. दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांनी लग्नासारखा महत्त्वाचा विषय हाताळत प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त केले आहे. सादरकर्ते अवनीश व अथर्व प्रकाशित या नाटकाची निर्मिती‘नाटकमंडळी’ यांनी केली आहे.


करोनाच्या दोन लाटांशी लढा दिल्यानंतर तणावाच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी ‘आमने सामने’ नाटकाची 'हास्याच्या लशीची मात्रा' प्रत्येकाने नाटयगृहात जाऊन अवश्य अनुभवायला हवी.


हेही वाचा :