Aai Kuthe Kay Karte : स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रेक्षकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. मालिकेतील कौटुंबिक सोहळे आणि जिव्हाळा हा प्रेक्षकांच्या मनाला भावाला आहे. या मालिकेत ‘आई’ अर्थात ‘अरुंधती’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरवर देखील कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लवकरच या मालिकेत ‘अरुंधती’चा बदललेला अवतार पाहायला मिळणार असल्याचे कळते आहे. नेहमी साडीमध्ये दिसणारी ‘अरु’ आता चक्क पंजाबी ड्रेसमध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. अद्याप यावर वाहिनीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, ‘आई’चा लूक बदलणार असल्याचे कळताच प्रेक्षक देखील आनंदित झाले आहेत.
‘अरुंधती’च्या स्वप्नांना मिळणार नवी भरारी!
लवकरच मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात येणारं एक सकारात्मक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजवर अरुंधतीने आपली स्वप्न, आवडीनिवडी बाजूला सारुन कुटुंबाला सर्वस्व मानलं. मात्र आता अरुंधतीच्या स्वप्नांना नवी भरारी मिळणार आहे. गाण्याची आवड असणारी अरुंधती आता मालिकेत पार्श्वगायिका होणार आहे. आशुतोषच्या मदतीने ती तिच्या आयुष्यातलं पहिलं गाणं रेकॉर्ड करणार आहे. मालिकेतला हा गाण्याचा प्रसंग सुरेश वाडकर यांच्या ‘आजिवासन’ स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे.
मालिकेतल्या या नव्या वळणाविषयी सांगताना मधुराणी म्हणाल्या की, 'खूप छान वाटतं आहे. मला जेव्हा 10 वर्षाच्या मोठ्या गॅप नंतर आई कुठे काय करते मालिकेत काम करण्याची संधी मिळाली, तीच आनंदाची भावना अरुंधती आता जेव्हा तिचं पाहिलं गाणं रेकॉर्ड करतेय तेव्हा आहे. आजिवासन स्टुडिओमध्ये येता क्षणीच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 12 वर्षांपूर्वी सुंदर माझं घर सिनेमाचं मी संगीत दिग्दर्शन केलं होतं, तेव्हा रोज यायचे. आज या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा योग जुळून आला. मी या वास्तुमध्ये पाय ठेवताच खुप भरून आलं. खूप आठवणी ताज्या झाल्या. आई कुठे काय करते मालिकेत आता अरुंधतीचा नवा प्रवास सुरु होतोय तो कसा असेल हे पाहण्यासाठी मी देखील उत्सुक आहे.'
हेही वाचा :
- One Four Three : आर्या आंबेकरचा सुरेल आवाज, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'वन फोर थ्री'चे लव्ह साँग!
- Gehraiyaan twitter review: दीपिकाचं कमबॅक चाहत्यांसाठी ठरलं मनोरंजनाची मेजवानी! पाहा नेटकरी काय म्हणतायत...
- Shamshera : दरमदार टीझरसह रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ची रिलीज डेट जाहीर, संजय दत्तही दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha