A perfect Murder Marathi Natak: मराठी रंगभूमीवर लवकरच एक रोमांचक अनुभव साकारला जाणार आहे. ‘अ परफेक्ट मर्डर’! हिचकॉकच्या थरार आणि गूढतेच्या विश्वाला मराठी रंगमंचावर जिवंत करणाऱ्या या नाटकात अभिनेत्री दिप्ती भागवत ‘मीरा’ ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे.
“हिचकॉक म्हणजे थ्रिलचा सम्राट! त्यांच्या चित्रपटांमधला रहस्याचा आणि भावनांच्या भीतीचा सूक्ष्म खेळ नेहमीच मला भुरळ घालतो,” असं दिप्ती सांगते . ‘अ परफेक्ट मर्डर’च्या माध्यमातून त्या या गूढतेला रंगमंचावर साकारताना दिसणार आहेत. हे नाटक सर अल्फ्रेड हिचकॉक यांच्या क्लासिक कथानकावर आधारित असून लेखक नीरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनी त्याला मराठी रूप दिलं आहे. “मूळ कथेचा थरार आणि आत्मा जपून, मराठी संवेदनांना भिडेल असं रूपांतर करणं ही मोठी जबाबदारी होती पण आमच्या संपूर्ण टीमने ती अप्रतिमरीत्या पार पाडली,” असं दिप्ती उत्साहाने सांगते.
‘मीरा’ भावनांचा आणि गूढतेचा संगम
दिप्तीची ‘मीरा’ ही व्यक्तिरेखा श्रीमंती, सौंदर्य आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे; पण तिच्या आत दडलेले भावनांचे वादळ, तिचे गुपित, आणि तिच्या नजरेत दडलेलं सत्य हे सगळं प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारं आहे. “ती गुन्हेगार आहे की परिस्थितीची बळी हे नाटकच उलगडून दाखवतं,” असं दिप्तीने सांगतात.
या भूमिकेसाठी भावनिक खोली आणि शांत संयम दोन्हीची आवश्यकता असल्याचं त्या सांगतात. “प्रत्येक प्रसंग हा प्रेक्षकांशी थेट संवाद साधतो. काही भावना शब्दांमध्ये नाहीत ,त्या डोळ्यांत, नजरेत, आणि त्या थांबलेल्या शांततेत व्यक्त होतात,” असं ती म्हणतात. दिग्दर्शक विजय केंकरे यांच्यासोबत काम करणे म्हणजे “शिकण्याचा आणि शोधाचा प्रवास” असल्याचं दिप्तीने सांगितलं. “प्रत्येक तालमीमध्ये त्यांनी ‘मीरा’च्या वेगवेगळ्या छटा दाखवल्या. त्यामुळे मला ही व्यक्तिरेखा फक्त साकारता नाही, तर आतून जगता आली.”
सहकलाकार आणि मंचावरचा अनुभव
या नाटकात दिप्ती सोबत अनिकेत विश्वासराव, श्वेता पेंडसे, राहुल पेठे, सुबोध पंडे आणि पुष्कर श्रोत्री हे कलाकार झळकणार आहेत. बदाम राजा प्रोडक्शन प्रस्तुत या नाटकाबद्दल दिप्ती म्हणाली, “या टीमसोबत काम करणं म्हणजे एक सहज आणि प्रेरणादायी अनुभव आहे.”
‘अ परफेक्ट मर्डर’: थ्रिल आणि भावना यांचा संगम
“हे फक्त रहस्यनाट्य नाही, हा एक भावनिक प्रवास आहे. सस्पेन्स, नात्यांचा गुंता आणि अभिनय यांचा सजीव संगम यात आहे. हा थरार अनुभवताना प्रेक्षक श्वास रोखून बसतील,” असा विश्वास दिप्तीने व्यक्त केला. विशेष म्हणजे, या नाटकाचा पुढचा 6वा प्रयोग 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता रॉयल ऑपेरा हाऊस या आयकॉनिक थिएटरमध्ये होणार आहे .जिथे मराठी नाटके क्वचितच रंगतात. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे हा प्रयोग विशेष ठरणार आहे. हिचकॉकच्या थराराची मराठी आवृत्ती म्हणून ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक रंगभूमीवर एक अविस्मरणीय अनुभव देणार आहे. जिथे प्रत्येक नजर, प्रत्येक शांतता आणि प्रत्येक श्वास एक रहस्य सांगतो!