यवतमाळ: विदर्भातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक असणाऱ्या यवतमाळ-वाशिमची निवडणूक यंदा कधी नव्हे इतकी चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. गेल्या पाच टर्मपासून यवतमाळ लोकसभा (Yavatmal Lok Sabha) मतदारसंघावर शिवसेनेच्या भावना गवळी यांचे एकहाती वर्चस्व होते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अँटी-इन्कम्बन्सीचा फॅक्टर आणि भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे महायुतीने भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे यवतमाळमधून शिंदे गटाने  हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील (महाल्ले) (Rajshri Patil) यांना रिंगणात उतरवले होते. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरलेल्या ठाकरे गटाचे संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांचे आव्हान होते.

LIVE Updates:

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांनी शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांचा 94,000 मतांनी पराभव केला. 

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंतचे कल हाती आले असून ठाकरे गटाचे संजय देशमुख 32,213 मतांनी आघाडीवर आहेत. संजय देशमुख यांना सातव्या फेरीअखेर 1,56,253 मते मिळाली आहेत. तर शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांना 1,24,040 मते मिळाली आहेत. ही सकाळी अकरा वाजेपर्यंतची आकडेवारी असून अंतिम निकाल हाती येण्यास काही वेळ लागेल.

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ 2024 ( yavatmal washim Lok Sabha Election Result 2024) 

         उमेदवाराचे नाव               पक्ष            विजयी उमेदवार
        राजश्री पाटील         शिवसेना (शिंदे गट)  
          संजय देशमुख ठाकरे गट ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)  
     

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदानाची विधानसभानिहाय टक्केवारी

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ वाशिम मतदारसंघात मतदान पार पडले होते. या मतदारसंघात 2019 च्या तुलनेत मतदान वाढले. यंदा यवतमाळमध्ये सरासरी 62.87 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का 1.78 टक्क्यांनी वाढला. शहरी भागात मतांची टक्केवारी कमी असली तरी ग्रामीण भागात मात्र भरभरुन मतदान झाले. 19 लाख 40 हजार 916 मतदारांपैकी 12 लाख 20 हजार 189 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 61.31 टक्के इतकी होती. हा वाढलेला मतदानाचा टक्का राजश्री पाटील आणि संजय देशमुख यांच्यापैकी कोणासाठी फायदेशीर ठरणार, हे पाहावे लागेल. 


राळेगाव- 68.96 टक्के
यवतमाळ- 59.46 टक्के
वाशीम- 60.56 टक्के
कारंजा- 60.98 टक्के
पुसद- 61.79 टक्के
दिग्रस- 66.61 टक्के


यवतमाळ लोकसभा मदरसंघातील आमदार 

राळेगाव–  अशोक उईके (भाजप)

वाशीम – लखन मलिक ( भाजप)

कारंजा – राजेंद्र सुखानंद पटनी (भाजप)

पुसद – नाईक इंद्रनील मनोहर (राष्ट्रवादी काँग्रेस)

यवतमाळ – मदन येरावार (भाजप)

दिग्रस – संजय राठोड (शिवसेना)

2019 मध्ये यवतमाळ-वाशिम लोकसभेचा निकाल

गेल्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशिम मतदारसंघात शिवसेनेकडून लढताना भावना गवळी यांनी विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा लाखभरापेक्षा जास्त मताधिक्याने पराभव केला होता. 


भावना गवळी-  5,42,098 (46.02 टक्के)

माणिकराव ठाकरे- 4,24,159 

 

कुणबी विरुद्ध देशमुख फॅक्टर महत्त्वाचा

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात देशमुख, मराठा, कुणबी (डीएमके) हा फॅक्टर निर्णयाक ठरण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत यवतमाळ लोकसभेची लढाई  देशमुख, मराठा, कुणबी (डीएमके) विरूद्ध बंजारा व इतर समाज अशी धाटणीची होती. परंतु, यंदा शिंदे गटाने राजश्री पाटील यांना रिंगणात उतरवल्याने यवतमाळमध्ये देशमुख विरूद्ध कुणबी समाज अशी थेट लढत पाहायला मिळू शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे. महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील-महल्ले या तिरळे कुणबी समाजातील आहेत. यवतमाळच्या राजकारणावर आजपर्यंत तिरळे कुणबी समाजाचा प्रभाव राहिला आहे. परंतु, मध्यंतरीच्या काळात तिरळे कुणबी समाजाचा प्रभाव कमी झाला होता. संजय राठोड यांच्या रुपाने यवतमाळ मतदारसंघाची सूत्रे बंजारा समाजाच्या हाती राहिली आहेत. मात्र, यंदा ठाकरे गटाने संजय देशमुख यांना उमेदवारी दिल्याने देशमुख समाजही पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज आहे.  

यवतमाळ लोकसभेत कुणबी समाजाचे मतदान साधारण 5 लाखांच्या आसपास आहे. तर पुसद परिसरात देशमुख आणि पाटील समाजाचे वर्चस्व आहे. गेल्या काही काळातील मराठा विरुद्ध ओबीसी वादामुळे कुणबी मतदार राजश्री पाटील यांच्या पाठिशी उभा राहू शकतो. याशिवाय, संजय राठोड यांच्या रुपाने बंजारा समाजाचा मोठा नेताही राजश्री पाटील यांच्या पाठिशी आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

आणखी वाचा

Shirur Lok Sabha Result 2024 : शिरुरच्या लढतीत कोणाच्या विजयाचा गाडा चौखुर उधळणार? अमोल कोल्हे की आढळराव पाटील कोण बाजी मारणार?