भोपाळ, जयपूर : मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटल्याचे पहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींशी बोलणी झाल्यानंतर शेवटी ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दिल्लीतील हायकमांडच्या निर्णयानंतर हे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.


तत्पूर्वी काँग्रेस आमदारांच्या बैठकीतही हायकमांडचा निर्णय अंतिम राहील, यावर सर्वच आमदारांचे एकमत झाले होते. त्यानंतर, दिल्लीतून हाय कमांडमध्ये झालेल्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला.

दुसऱ्या बाजूला राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाचा तिढा अध्याप सुटलेला नाही. राजस्थानमधील विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कुणाला बहाल करायची हा पेच काँग्रेसला सोडवावा लागणार आहे. सचिन पायलट की अशोक गेहलोत? हायकमांड नेमकं कुणाच्या बाजूने त्यांचा कौल देणार याची उत्सुकता लागली आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असणाऱ्या सचिन पायलट आणि अशोक गहलोत या उमेदवारांची नेमकी काय बलस्थानं आहेत, आणि कुठल्या गोष्टी त्यांच्या विरोधात जाऊ शकतात काँग्रेसचे हाय कमांड सध्या यावर विचार करत आहे.