मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं राजीनामानाट्य सुरु असताना, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. ही भेट नेमकी का झाली? भेटीत काय घडलं? ही माहिती गुलदस्त्यातच होती. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार आणि संजय राऊत यांची भेट ही आदित्य ठाकरेंसाठी होती, असं कळतं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे राजकारणात आल्यानंतर, त्यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला होता. आता आदित्य ठाकरे यांचं राजकारणात पदार्पण होत असल्याने त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने उमेदवार देऊ नये, या संदर्भातील बोलणी या भेटीत झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.

अजित पवार यांनी 27 सप्टेंबर रोजी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या सिल्वर ओक इथल्या निवासस्थानी वेगाने घडामोडी घडत होत्या. त्यातच दुपारी साडेतीनच्या सुमारास संजय राऊत पवारांच्या निवासस्थानी दाखल झाल्यावर विविध चर्चांना उधाण आलं. परंतु ही भेट आदित्य ठाकरेंसाठी असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून उभे राहणार असल्याचं कळतं. संभाव्य उमेदवारांच्या यादीतही त्यांचं आहे. आदित्य ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार आहे. त्यामुळे आघाडीमध्ये वरळीची जागा राष्ट्रवादीकडे आहे. राज्यसभेत सुप्रिया सुळे यांच्यासाठी केलेल्या मदतीची आठवण करुन देत, आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये, असा शिवसेनेचा आग्रह असल्याचं समजतं.



संबंधित बातम्या