पुणे येथे भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांनी बारामती सुद्धा जिंकू असे वक्तव्य केले होते. यावर नवाब मलिक यांनी टीका केली आहे. हे 48 पैकी 45 जागा जिंकू आणि त्यामध्ये बारामतीचा समावेश असेल असे सांगत आहेत. नशीब की अमित शाह यांनी 48 पैकी 50 जागा जिंकणार असे भाकीत केले नाही, अशी खिल्लीही नवाब मलिक यांनी उडवली आहे.
अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांनी बारामतीचा उमेदवार कोण असणार, नरेंद्र मोदी की अमित शाह की स्वतः मुख्यमंत्री हे आधी जाहीर करावे, असे खुले आव्हान भाजपला दिले आहे.
यावेळी 43 जागा जिंकू आणि 43 वी जागा बारामतीची असेल : देवेंद्र फडणवीस
मागच्यावेळी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 42 जागा जिंकल्या यावेळी 43 जागा जिंकू आणि ही 43वी जागा बारामतीची असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते पुण्यातील बुथ प्रतिनिधीच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने 48 जागांवर लढणार आहोत. शिवाय यावेळी गेल्या निवडणुकीपेक्षा एक जागा जास्त जिंकू आणि ती एक जागा बारामतीची असेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे. सध्या बारामती मतदार संघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत.
या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीवर घाणाघाती टीका केली. देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यास ही देशातील जनतेची ऐतिहासिक चूक असेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपच्या काळात लोकांच्या हितांचे निर्णय घेण्यात आले, मात्र मनमोहन सिंह यांच्या सरकारच्या काळात निर्णयचं घेतले जात नव्हते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केला आहे.
तरुणांच्या या भारत देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारख्या पंतप्रधानाची गरज आहे. कारण नरेंद्र मोदी एक क्षणही वाया घालवत नाही. त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी दिला आहे. मोदींनी 21 वं शतक भारत देशाच्या नावे केलं आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.