पुणे: निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावाच्या याद्या जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. भाजपच्या 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी अद्याप कोणतीही यादी किंवा नावे जाहीर केली नसल्याने आता त्यांच्या उमेदवारांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीची जागा वाटपाच्या अंतिम चर्चा झाल्यानंतरचं महाविकास आघाडीतील पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर होणार असल्याची माहिती आहे. 


आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होत असताना महाविकास आघाडीतील पक्षांच्या उमेदवारी याद्या नेमक्या कधी जाहीर होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या पहिल्या याद्या यामध्ये अनेकांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या उमेदवारी याद्या तयार आहेत. मात्र, आज जागा वाटपावर अंतिम निर्णय झाल्यानंतरच उमेदवारी याद्या पक्षांकडून जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती आहे.


काँग्रेसच्या काल दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर आज बाळासाहेब थोरात दुपारी उद्धव ठाकरे आणि त्यानंतर शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीची एकत्रित बैठक होणार आहे. त्यामध्ये अंतिम तोडगा काढून जागा वाटपावर निर्णय होईल 
त्यामुळे दुपारनंतर किंवा उद्या महाविकास आघाडीतील पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर केल्या जातील, अशी शक्यता आहे. 


काँग्रेसची 96 उमेदवारांवर शिक्कामोर्तब


महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा चर्चा सुरू असतानाच सोमवारी दिल्लीत काँग्रेसने सुमारे 96 उमेदवारांवर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा सुरू आहेत. त्यातील 62 उमेदवारांची काँग्रेसची पहिली यादी आज (मंगळवारी) जाहीर होणार आहे. या जागांपैकी 58 जागांबाबत कोणताही वाद नसून तिन्ही घटक पक्षांचे एकमत झाल्याची माहिती आहे.


आज जागा वाटपावर अंतिम निर्णय


आज जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार आहे. जागावाटपाबाबत काँग्रेस व ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात असलेले मतभेद मिटवण्याची जबाबदारी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती आहे. बाळासाहेब थोरात आज (मंगळवारी) उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी जागा वाटपावर अंतिम चर्चा करणार आहेत. या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडणार आहे. त्यानंतर तिन्ही पक्ष पहिली यादी जाहीर करणार आहेत.


महाविकास आघाडीतील तीन पक्ष नेमक्या किती जागा लढवणार असल्याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राज्यातील विदर्भातील 12 जागांचा वाद सोमवारपर्यंत कायम होता. याबाबत काँग्रेसने मवाळ भूमिका घेतल्याची माहिती आहे. वादात असलेल्या जागांबाबत आज (मंगळवारी) मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.