पुणे: पुण्यात मे महिन्यामध्ये झालेल्या कल्याणीनगर पोर्शे कार अपघाताप्रकरणात नाव घेऊन बदनामी केली तर कोर्टात खेचीन, अशी नोटीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवली असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी (शुक्रवारी) महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेच म्हटलं आहे. त्या नोटिसवर सुप्रिया सुळे यांनी सुनील टिंगरेंना टोला लगावला. ज्या शरद पवार साहेबांनी मागील निवडणुकीकरता एबी फॉर्मवर सही करून सुनील टिंगरे यांच्या हातात फॉर्म दिला. त्यांनीच शरद पवारांच्या नोटीस पाठवली आहे, असं सुळेंनी म्हटलं, त्यावरती मी नोटीस पाठवली नसल्याचं आमदार सुनील टिंगरे यांनी एबीपी माझाला सांगितलं होतं. मात्र, टिंगरेंनी पाठवलेली नोटीस एबीपी माझाच्या हाती आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सुनील टिंगरे यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना ही नोटीस पाठवली होती असं त्यांनी म्हटलं होतं, मी शरद पवारांना नाही तर पक्षाला नोटीस पाठवली होती, असं त्यांनी म्हटलेलं होतं. मात्र, या नोटीसवरती शरद पवारांचं नाव लिहण्यात आलेलं आहे. पोर्शे प्रकरणात बदनामी करू नये, अशी नोटीस त्यांनी दिलेली होती. त्यांनी ती नोटीस शरद पवारांना पाठवल्याचं समोर आलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
शरद पवारांनी मागील महिन्यात वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांच्या प्रचारासाठी एक सभा घेतली होती या सभेमध्ये आमदार सुनील टिंगरे यांच्यावर आरोप केलेले होते. पुण्यामध्ये मे महिन्यात कल्याणी नगर भागात पोर्शे कारचा अपघात झाला होता. त्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्या अपघातातील कारचालक अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याबद्दलचा आरोप आमदार सुनील टिंगरे यांच्या वरती करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने शरद पवारांनी देखील आरोप केले होते, त्यानंतर सुनील टिंगरे यांनी त्यांच्या वकिलामार्फत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना त्या पक्षांच्या पक्षप्रमुखांना उद्देशून नोटीस पाठवली होती.
या नोटीसीमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं. जर आपली बदनामी करण्यात आली तर आपण फौजदारी कारवाई करू आणि ही नोटीस पक्षप्रमुख या नात्याने शरद पवार यांना मिळाली. त्यांच्या पक्ष कार्यालयात ही नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नेत्याच्या प्रचारावेळी या मुद्द्याला हात घातला. यावेळी बोलताना त्यांनी सुनील टिंगरेंवर हल्लाबोल केला होता. ज्या हाताने गेल्यावेळी एबी फॉर्म दिला त्याच हातात सुनील टिंगरे यांनी नोटीस दिली असं म्हणत टिंगरे यांना लक्ष केलं होतं त्यावर टिंगरेनी मी शरद पवारांना नोटीस पाठवलेली नाही मी महाविकास आघाडीतील पक्षांना नोटीस पाठवली आहे असं म्हटलं होतं मात्र आता ही नोटीस एबीपी माझाच्या हाती आली आहे.