Shivsena Uddhav Thackeray on Eknath Shinde: अत्यंत अटीतटीच्या आणि श्वास रोखून धरायला लावलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीला काठावर बहुमत मिळाले. भाजप शिंदे गटाला 118 जागा मिळाल्या. ठाकरे बंधूंनी कोणत्याही साधनांशिवाय आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही लढत देताना तब्बल 71 जागा मिळवल्या. काँग्रेसनेही 24 जिंकल्या. त्यामुळे भाजपला मोठा विजय मिळवता आला नाही. दुसरीकडे मुंबईमध्ये गेल्या तीन दशकानंतर प्रथमच भाजपचा महापौर बसण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या सोबतीला शिंदे गट असेल.
मात्र, ज्या मुंबईमध्ये शिवसेनेने जन्म घेतला, शिवसेना वाढली, आजपर्यंत मराठी महापौर दिले त्या मुंबईत आता मराठी महापौर नसल्याने ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एकनाथ शिंदे यांना काळजाला हात घालणारे सात प्रश्न विचारले आहेत. राजधानीतून मराठी अस्मितेची तिरडी उचलून काय मिळवलं? असा सवाल चित्रे यांनी केला आहे. ते म्हणाले की चिन्ह, पक्ष, नेते आणि नंतर शिवसेनेचे ५६ नगरसेवक फोडून निवडून आणलीत फक्त 28 माणसं, मग शिवसैनिकाला दुबळं करुन काय मिळवलंत? अशीही विचारणा त्यांनी केली आहे.
अखिल चित्रे यांनी काय म्हटलं आहे?
♦️ स्वतःला शिवसेना आणि स्व. बाळासाहेबांचे पाईक म्हणवणाऱ्यांनो काय मिळवलंत ?♦️ ज्या मुंबईत स्व. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापिली तिथून शिवसेना हद्दपार करण्याच्या कटाचे भागीदार होऊन काय मिळवलंत ?♦️ “मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे!” ह्या स्व. बाळासाहेबांच्या निर्धाराला मूठमाती देऊन काय मिळवलंत ? ♦️ सत्तेच्या लाचारीत मश्गूल होऊन, शिवसेना फोडून, भाजपाला पाठिंबा देऊन मुंबई कमळीच्या दावणीला बांधून काय मिळवलंत ? ♦️ चिन्ह, पक्ष, नेते आणि नंतर शिवसेनेचे ५६ नगरसेवक फोडून निवडून आणलीत फक्त २८ माणसं, मग शिवसैनिकाला दुबळं करुन काय मिळवलंत ? ♦️ शिवसेनेचं प्रभुत्व नाकारून आता भाजपाचा महापौर होईल, राजधानीतून मराठी अस्मितेची तिरडी उचलून काय मिळवलंत ? ♦️ थैलीशहांना आपली मुंबई स्वार्थासाठी विकून काय मिळवलंत?
इतर महत्वाच्या बातम्या