खनिज संपत्तीचं वरदान लाभलेल्या वणीच्या भूभागाला ब्लॅक डायमंड म्हणून ओळखले जातं. वणी परिसरात 13 कोळसा खाणी आहेत. त्यामुळेच दरवेळी विधानसभा निवडणुकीत स्थानिकांना कोळसा खदान परिसरात रोजगार मिळावा हा मुद्दा घेऊन राजकारण तापतं.  येथील निवडणूक अनेकांचे राजकीय भविष्य ठरविणारी असल्याने याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेलं असतं.

वणीच्या कोळसा खाणीत काम करणारा कामगार वर्ग  मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आहे. या भागातील स्थानिक बेरोजगारांना या कोळसा खदान व्यवसायामध्ये नोकरी किंवा तत्सम रोजगार उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे इथे नेहमी स्थानिकांना घेऊन राजकीय वातावरण तापत असतं. विशेष म्हणजे ज्या भागामध्ये वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोली) साठी शेतकऱ्यांनी  आपल्या शेतजमिनी दिल्या, त्या शेतकऱ्यांची मुलं भूमिहीन झाली असून रोजगाराच्या शोधात त्यांना भटकंती करावी लागते.


कोळसा खाणीसाठी वेकोलीला जमिनी दिल्यानंतर विस्थापित भूमीपुत्राचं पुनर्वसन झालेल्या ठिकाणी अनेक भागात मूलभूत नागरी सुविधांचा अभाव आहे. हा मतदारसंघ आतापर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता.

वणी मतदारसंघांमध्ये मारेगाव, वणी आणि झरी या तीन तालुक्‍यांचा समावेश आहे. साधारण 306 पेक्षा जास्त गावे या मतदारसंघात असून या मतदारसंघांमध्ये 2 लाख 82 हजार 631 एवढे मतदार आहेत.

हा मतदारसंघ कुणबी बहुल आहे. माजी आमदार वामनराव कासावार वगळता, बहुतांश वेळा कुणबी समाजानेच आजवर या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय. हा समाज या मतदारसंघाच्या राजकारणाची दिशा निश्चित करतो.



या मतदारसंघात वणी आणि झरी तालुक्यातील काही भागांमध्ये कोळसा खाणी आहेत, मात्र मारेगावसारखा तालुका वणीपासून जवळपास 17 किलोमीटर अंतरावर असल्याने वणीची सावली नेहमीच मारेगाव येथे पाहायला मिळते.  मारेगावचे सर्व व्यवहार वणी येथे होतांना दिसतात. त्यामुळे मारेगावच्या समस्यांकडे कायम दुर्लक्ष होत आलं आहे. या तालुक्यात एमआयडीसी नावालाच आहे, तिथे कुठलाही नवा उद्योग नाही म्हणून बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे.

कोळसा खाणीव्यतिरिक्त या भागातील मोठं शेतीपिक म्हणजे कापूस आहे. एका बाजूला कोळसा तर दुसऱ्या बाजूला कापूस म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट गोल्ड. कापसाची मोठी बाजारपेठ असूनही या मतदारसंघात सूतगिरणी उद्योग नाही. ज्या सूतगिरण्या सुरु झाल्या, त्या बंद पडल्या आहेत. बंद सूतगिरणीवरून फक्त राजकीय हितसंबंध साधले जातात.

शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली इंदिरा सहकारी सूतगिरणी ही सध्या भाजप आणि शिवसेनेच्या ताब्यात आहे, मात्र सुतगिरणी बंद असल्याने सध्या त्याचा फक्त राजकीय आखाडा झाला आहे.

वनी विधानसभेच्या मारेगाव आणि झरी या ठिकाणी एकेक ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र दुर्गम भाग असल्याने शासकीय कर्मचारी वेळेवर हजर नसतात. अनेक रुग्णांना रेफर टू करुन वणी येथे पाठवले जाते. या वणी ग्रामीण रुग्णालयाची अवस्था कर्मचारी नसल्याने दयनीय झाली आहे. मात्र त्याकडे कोणी लक्ष देत नाही. दुसरीकडे वणी येथे  दोन वर्षांपूर्वी ट्रामा केअर सेंटर बांधून तयार झाले आहे, फक्त उद्घाटनाअभावी त्याचा वापर बंद आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना चंद्रपूर किंवा नागपूर या ठिकाणी उपचारासाठी जावं लागतं.

वणी तालुक्यातील ग्रामीण भाग आणि झरी मारेगाव या तालुक्याच्या अनेक गावांमध्ये  दूषित पाण्यामुळे अनेकांना किडनी आणि पोटाचे आजार झाले आहेत. कोळसा खदानींमुळे होणारं प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. कोळसा खाणींच्या प्रदूषणाचा फटका या परिसरातील पिकांनाही बसतो. पण त्याकडे कुणीच लक्ष देत नाही.

वणी शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीचे दुष्परिणाम वणीला भोगावे लागत आहेत. चंद्रपुरात दारुबंदी झाल्यामुळे तिथला दारुचा व्यापार वणीमध्ये स्थलांतरीत झाला आहे. यामुळे वणीमध्ये एका अर्थाने आर्थिक सुबत्ता आली असली तरी त्याचे मोठे सामाजिक दुष्परिणामही दिसत आहेत.

वणी विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळणी झाली आहे. कोळश्याची ओव्हरलोड वाहतूक हे रस्ते खराब होण्याचं प्रमुख कारण. खराब रस्त्यांमुळे होणारे भीषण अपघात येथील नेहमीची समस्या बनलीय.

मागील पंधरा वर्षांमध्ये या मतदारसंघांतील परिवर्तनवादी मतदारांनी वेगवेगळ्या लोकांना संधी दिली. वणी मतदारसंघांमध्ये 1962 आणि 1967  मध्ये  काँग्रेसचे विठ्ठल गोहोकार जिंकून आले होते. त्यानंतर 1972 साली अपक्ष दादाराव नांदेकर जिंकून आले. 1978 आणि 1980 साली बापूराव पानघाटे जिंकून आले होते. तर 1885 साली भाकपचे नामदेव काळे जिंकले. त्यानंतर  1990 ते 1999 या काळामध्ये या भागातून काँग्रेसचे वामनराव कासावार यांनी बाजी मारली. मात्र 2004 मध्ये शिवसेनेचे विश्वास नांदेकर यांनी वणी विधानसभेमध्ये प्रथमच भगवा फडकवला. त्यानंतर शिवसेनेची ताकद सुद्धा वाढत गेली. 2009 मध्ये काँग्रेसचे वामनराव कासावर  यांनी मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली. 2014 च्या मोदी लाटेत भाजपचे नवीन उमेदवार संजीवरेड्डी बोदकूरवार यांना मतदारांनी पसंती दिली.

2014 च्या निवडणुकीत सर्वच पक्ष वेगवेगळे लढल्यामुळे मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालं, त्याचा फायदा संजीवरेड्डी बोदकूरवार यांना मिळाला.  त्यांना 45178 मते मिळाली. शिवसेनेचे विश्वास नांदेकर म्हणजे यांना 39572 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे संजय देरकर यांना 31221 मतं मिळाली होती. काँग्रेसचे वामनराव कासावार 38964 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. तर मनसेचे राजू उंबरकर यांना 27054 मते मिळाली.

यावेळेस मात्र या निवडणुकीमध्ये आपापल्या पक्षातून तिकीट मिळावे यासाठी अनेकांची स्पर्धा लागलेली आहे. विद्यमान भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या समोर वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे आव्हान आहे. ते माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचे खंदे समर्थक असून, लोकसभा निवडणुकीत त्यांनी बरीच मदत केली होती. तर पक्ष संघटनेत अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले भाजपाचे रवी बेलुरकर आणि विजय पिदुरकर हे सुध्दा वणीतून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भाजप कुणाला तिकीट देते यावर बरेच काही अवलंबून राहील.

तर दुसरीकडे शिवसेनेचे विश्वास नांदेकर यांना येथील जनतेने 2004 मध्ये विधानसभेमध्ये पाठवलं होतं. त्यानंतर विश्वास नांदेकर यांनी 2009 आणि 2014 मध्ये येथून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढविली, पण त्यांचा पराभव झाला. पराभवाने खचून न जाता त्यांनी या मतदारसंघात पक्षाचा विस्तार केला. आता शिवसेनेमध्येही नवे स्थानिक नेते उदयास येत आहेत. यामध्ये इंदिरा सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष संजय कातकडे आणि शिंदोला येथील संजय निखाडे हे सुद्धा आपल्याला शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून उत्सुक आहेत. इच्छुकांना त्यांना अपेक्षित पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी होण्याचीही शक्यता आहे.

मागील वेळी राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधून विधानसभा निवडणूक लढणारे संजय दरेकर हे आता राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहेत. ते आता काय भूमिका घेतात हे यावरही बरंच अवलंबून आहे.

आरोग्यसेवेच्या माध्यमातून बीड येथून वणीमध्ये आलेले आणि येथेच स्थायिक झालेले डॉ. महेंद्र लोढा हे बीडचे राजकीय वजन वापरून राष्ट्रवादीचे तिकीट मिळावे म्हणून प्रयत्नशील आहेत. आघाडीत काँग्रेसला उमेदवाराला तिकीट मिळाले तर ते स्वतंत्र उभे राहून स्वतःचे अस्तिव दाखविण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे.

काँग्रेसमध्ये मात्र या निवडणुकीमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते. आताच झालेल्या काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये वणी विधानसभेसाठी 18 उमेदवारांनी इच्छुक म्हणून मुलाखती दिल्या आहेत. काँग्रेसचे तिकीट मिळावे म्हणून अनेकजण उत्सुक आहेत. त्यामध्ये डॉ मोरेश्वर पावडे, टिकाराम कोंगरे, नरेंद्र ठाकरे, देवीदास काळे आणि जिल्हा परिषद सदस्य अरुणा खंडाळकर असे अठरा इच्छुक आहेत. अनेकांनी यवतमाळ येथे काँग्रेस इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखती सुध्दा दिल्या आहेत.

हा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभेमध्ये येत असल्याने या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांच्या संपर्कात राहून तिकीट मिळावे म्हणून अनेक जण प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे बाळू धानोरकर यांना काँग्रेसकडून तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करणारे आणि लोकसभा जिंकून आणण्यासाठी  जीवाचं रान करणारेही आता धानोरकर यांनी आपली पक्षाकडे शिफारस करावी अशी मागणी करीत आहेत. खासदार बाळू धानोरकर कुणाच्या बाजूने कौल देतात हे महत्त्वाचे ठरणारे आहे. त्यामुळे या वणी विधानसभेमध्ये काँग्रेस उमेदवार कोण या बाबत अजून अनिश्चितता आहे.