मुंबई : आपली प्रतिमा मलीन व्हायचं काही कारण नाही, मी कार्यकर्त्यांना भेटायला गेलो होतो. तसेच भाजप नेत्याने आपली टीप दिली होती ही बातमी खोटी असल्याचं भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितलं. मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं सांगत ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र हे आपलं ठरलं असल्याचंही ते म्हणाले. पैसे वाटल्याचा आरोप झाल्यानंतर विनोद तावडेंनी माध्यमांना पहिलीच प्रतिक्रिया दिली.


विरारमध्ये एका हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले आणि पुढे राडा झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या बातम्याही आल्या. त्यावर आता विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 


Vinod Tawde Cash Case : आपल्यावर पैसे वाटल्याचा गुन्हा नाही


विनोद तावडे म्हणाले की, "विरारच्या राड्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. आपण पत्रकार परिषद घेतली त्याचा एक गुन्हा दाखल आहे. माझा मतदारसंघ नसताना मी तिथे गेलो यावर दुसरा गुन्हा दाखल झाला. तर हितेंद्र ठाकूर त्या ठिकाणी आले त्यावर तिसरा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पैसे वाटप झाल्याचा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. शंका आली तर तुम्ही सीसीटीव्ही तपासा."


भाजप नेत्याने टीप दिली का? 


हितेंद्र ठाकूर यांनी आपल्याला भाजप नेत्याने टीप दिल्याची माहिती माध्यमांना दिली होती. त्यावर बोलताना विनोद तावडे म्हणाले की, "हितेंद्र ठाकूरांनी सांगितलं की भाजपच्या नेत्याने टीप दिली. त्यांनी खोटं सांगितलं. नंतर त्यांनी गाडीतून जाताना त्यांनी सत्य सांगितलं. त्यामुळे भाजप नेत्याने कोणतीही टीप दिली नाही हे स्पष्ट झालं." 


मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्यामुळेच हे प्रकरण घडलं का असं विनोद तावडे यांना विचारण्यात आलं. त्यावर विनोद तावडे म्हणाले की, नो महाराष्ट्र, ओन्ली राष्ट्र हे आपलं आधीच सांगितलं आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. या प्रकरणी माझी प्रतिमा मलीन व्हायचा कोणताही संबंध नाही. कारण पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटायला मी गेलो होतो. गेली 25 वर्षे मी असेच करतो. त्यामुळे झालेले आरोप हे चुकीचे आहेत. 


 



ही बातमी वाचा