मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी बोरिवली विधानसभेचे विद्यमान आमदार आणि मंत्री विनोद तावडे यांची उमेदवारी कापत सुनील राणे यांना संधी देण्यात आली आहे. तावडे यांचा पत्ता कट केल्यानंतर त्यांनी उमेदवारी नाकारण्याचे कारण पक्षाने सांगितलं नसल्याचं एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे.


एबीपी माझाशी बोलताना तावडे म्हणाले की, आपण मंत्री नाहीत म्हणजे काम थांबणार नाही. आम्हाला नेशन फस्ट असं सांगितलं आहे. त्यामुळं इथून पुढं जी जबाबदारी दिली जाईल ती मनापासून पूर्ण केली जाईल, असे तावडे म्हणाले. तावडे म्हणाले की, बोरिवलीसह राज्यातील सर्व उमेदवार निवडून येतील. स्पष्ट बहुमताने आम्ही सत्तेत येऊ. सध्या मला उमेदवारी का दिली नाही याच्या विश्लेषणाची वेळ नाही, मात्र याबाबत वरिष्ठ स्तरावर नक्की चर्चा होईल. आता निवडणुकांची वेळ आहे. मी नेता नाही मी कार्यकर्ता आहे. जे काम दिलं जाईल ते चांगल्या पद्धतीने करेन, असेही ते म्हणाले.

आमचे काम राष्ट्र निर्माणाचं आहे. बरेच जण आमदार नाहीत तरी काम करतात. विद्यार्थी परिषद आणि संघाने आम्हाला राष्ट्रहिताचे काम करायचं शिकवलं आहे. मला उमेदवारी न देण्याचे कारण नक्की असेल मात्र अजून  बोलता आलेलं नाही, मात्र पक्षनेतृत्वाची चर्चा केली जाईल. काही चुकलं असेल तर पक्ष सांगेल आणि नंतर संधी देईल, असेही तावडे म्हणाले. भाजपमध्ये काम करताना पक्षाला अभिप्रेत असलेलं काम करेल. माझ्याकडून काही चुका झाल्यात असं वाटत नाही. असतील तर बोललं गेलं असतं. पक्षाचं काय धोरण किंवा राजकारण आहे हे निवडणुका झाल्यानंतर कळेल, असेही ते म्हणाले.

आपण भाजपचे कार्यकर्ते आहोत. मला राज्यभरातून फोन येत आहेत. सगळ्यांनी अस्वस्थ न होता काम करू आणि दोन तृतीअंश बहुमताने निवडणूक आणू, असेही तावडे म्हणाले. भाजपची चौथी यादी आज घोषित करण्यात आली. यामध्ये तावडे यांच्यासह प्रकाश मेहता, राज पुरोहित यांच्यासह तीन विद्यमान आमदारांचा पत्ता कापला गेला आहे.