मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जातीसाठी नाही तर मातीसाठी मतदान करा, या विधानावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जोरदार टीका केली आहे. शरद पवारांच्या तोंडी हे वाक्य ऐकल्यावर लोकांना माहिती असतं त्यामागे ते काय म्हणतात. शिरुरचा उमेदवार देतांना मातीचा की जातीचा विचार केला होता? असा सवाल करत जातीच्या आधारावर आता मतं मिळणार नाहीत, हे शरद पवारांना कळायला लागलंय, असा टोला तावडे यांनी लगावला आहे.


गेल्या 40 वर्षाच्या सत्तेच्या काळात शरद पवार यांचे घर पैशांनी भरले आहे, पण नरेंद्र मोदी यांची भूमिका 'न खाता हू और न खाने दूंगा' अशी असल्यामुळेच मोदी यांचे घर रिकामे आहे. शरद पवार यांचे घर का भरले हे देशाच्या जनेतला माहिती आहे. मोदी यांच्या विरुद्ध तुम्ही भ्रष्टाचाराचा एकही आरोप करु शकला नाहीत, असेही ते म्हणाले.

तावडे पुढे म्हणाले की, अजित पवार म्हणत आहेत की, भाजप साम दाम दंड भेद वापरत आहे. दादांना हे काही नवीन नाही. दादा आतापर्यंत हेच तर करत होते. मागच्या लोकसभा निवडणुकीत क्लिप त्यांची वायरल झाली होती, त्यात ते काय बोलले होते ते त्यांनी आठवावं. उगाच स्वतः अशी कामं करुन लोकांवर आरोप करु नये, असे तावडे म्हणाले.

गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये एकाही कलाकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याची एकही घटना घडली नाही, मग नरेंद्र मोदी यांना मतदान करु नका असे आवाहन करणारे कलाकार त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याची ओरड का करत आहेत? असा सवालही तावडे यांनी केला.

यावेळी धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर अनिल गोटे यांच्याविषयी ते म्हणाले की, मी अनिल गोटेंना भेटायला धुळ्याला जाणार आहे. त्यांना शंका असेल तर त्यांनी निरसन करून घ्यावं. ते भाजपबाहेर जाऊन काय होईल हे महापालिकेच्या निवडणुकामध्ये पाहिलं आहे, असेही ते म्हणाले.