अकलूजमध्ये मोहिते-पाटील पितापुत्रांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मेळाव्यातच मोहिते-पाटील पितापुत्रांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे.
जवळपास पाच हजार कार्यकर्त्यांनी मेळाव्याला हजेरी लावली होती. उपस्थित कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांना बिनधास्तपणे भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला. तुम्ही फक्त निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांना दिला.
VIDEO | अकलूजमध्ये मोहिते पिता-पुत्रांचा कार्यकर्त्यांशी संवाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत उद्या मोहिते-पाटील भाजपप्रवेश करण्याची चिन्हं आहेत. ऑपरेशन विखे-पाटीलनंतर भाजपचं ऑपरेशन मोहिते पाटील सुरु झाल्याचं चित्र आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काल रात्री उशिरा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांचीही ही पहिली भेट नव्हती. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या दिवशीही रणजितसिंह मोहिते पाटील गिरीश महाजनांसोबत दिसले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवार यादीत मोहिते-पाटलांचं नाव नव्हतं. त्यामुळे मोहिते पाटील कुटुंबामध्ये अस्वस्थता आहे, रणजीतसिंह पाटलांनी फेसबुक पोस्ट लिहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं होतं.