नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir Result 2024) तीन टप्प्यात निवडणूका पार पडल्या होत्या.एक ऑक्टोबरला शेवटच्या टप्प्याचे मतदान झाले होते. तर हरियाणात (Haryana Result 2024) विधानसभेसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल आठ ऑक्टोबरला येणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी करण्यात येईल. त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणीची सुरु होईल. जम्मू – काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर प्रथमच निवडणूका पार पडत आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निकालाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 


कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिलीच निवडणूक 


जम्मू – काश्मीर विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. जम्मू आणि काश्मीरसाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे. कारण ऑगस्ट 2019 रोजी काश्मीरचे कलम 370 हटविल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. कलम 370 हटविल्यानंतर तत्कालीन जम्मू आणि कश्मीर राज्यापासून लडाख आणि लेह यांना वेगळे करुन केंद्र शासित प्रदेशात त्याचे रुपांतर करण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर येथे नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेसने एकत्र निवडणूका लढविल्या आहेत. तर पीपल्स डेमोक्रेटीक पार्टी आणि भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढली आहे. 


हरियाणाच्या निकालाकडे लक्ष


हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरसाठी मतदान झाले होते. हरियाणात बीजेपी, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी मुख्य लढत होत आहे. तसेच नॅशनल लोक दल-बहुजन समाज पार्टी आणि जननायक जनता पार्टी आझाद समाज पार्टी यांच्यात निवडणूक पूर्व आघाडी झालेली आहे. या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


हरियाणात एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?


एनडीटीव्हीच्या पोलनुसार हरियाणात काँग्रेसला 55 आणि भाजपला 25 जागा मिळू शकतात. पीपल्स पल्समध्ये काँग्रेसला 49 ते 61 जागांवर तर भाजप 20 ते 32 जागांवर आघाडीवर दाखवला आहे. इंडिया टीव्हीच्या पोलनुसार काँग्रेसला 44 ते 54 जागा आणि भाजपला 19 ते 29 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पीमार्कच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 51 ते 61 जागा आणि भाजपला 27 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


जम्मू-काश्मीरमध्ये काय आहे एक्झिट पोलचा अंदाज?


रिपब्लिक टीव्ही-पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 38 ते 30 जागा, काँग्रेस-एन.सी. आघाडीला 31 ते 36 जागा, पीडीपीला 5 ते 7 जागा, तर अपक्षांना 8 ते 16 जागा मिळण्याची शक्यता आहे. न्यूज 24 चाणाक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजप 23 ते 27 जागा, काँग्रेस-एन.सी. 46 ते 50, पीडीपी 7 ते 11 तसेच इतर 4 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार भाजप 28 ते 30 जागा, काँग्रेस-एन.सी.आघाडीला 31 ते 36 जागा, पीडीपीला जागा 5 ते 7, तर अपक्षांना 8 ते 16 जागा. इंडिया टुडे-सी व्होटर्सच्या सर्वेनुसार काँग्रेस आणि एन.सी. आघाडीला 40 ते 48 जागा. भाजप 27 ते 32 जागा मिळण्याची शक्यता आहे. पीडीपीला 6 ते 12, तर अपक्षांना 6 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे.


निकाल कुठे पाहाल? 


जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोनही राज्याच्या मतमोजणीला मंगळवार (दि. 08) सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पोस्टल बॅलेट मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. साधारणतः दुपारपर्यंत दोन्ही निवडणुकांचे चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीचा निकाल तुम्हाला एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे. 


आणखी वाचा 


Exit Poll : जम्मू काश्मीर-हरयाणामध्येही काँग्रेसचे पारडे जड, कुणाची सत्ता येणार? काय सांगतो एक्झिट पोल