Bandra East Vidhan Sabha Election : मुंबई : विधानसभा निवडणुकांची (Vidhan Sabha Election 2024) चुरस रंगली असून अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीचं घोडं जागावाटपावर अडून बसलं आहे. काही जागांचा तिढा सुटला असून काही जागांवरचा पेच अद्याप कायम आहे. यापैकीच एक जागा वांद्रे पूर्वची आणि दुसरी जागा दिंडोशीची. वांद्रे पूर्वची जागा महायुतीकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटली आहे. अजितदादांनी या जागेवरुन झिशान सिद्दिकींच्या नावाची घोषणा केली आहे. तर, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाईंना रिंगण्यात उतरवण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे दिंडोशीच्या जागेवरुन संजय निरुपम यांना तिकीट देण्यात आलं आहे. 


मुंबईतील वांद्रे पूर्वच्या जागेवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघ सध्या काँग्रेसकडे असून याठिकाणी झिशान सिद्दीकी आमदार आहेत. झिशान सिद्दिकींनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला असून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर ठाकरेंकडून वरुण सरदेसाई आहे. मात्र, आता या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात  राष्ट्रवादी काँग्रेसच्या झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर  हे आज या मतदार संघातून अपक्ष उमेदवारी भरणार आहेत. त्यामुळे आता अजितदादांच्या राष्ट्रवादीचे झिशान सिद्दिकी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. 


दुसरीकडे वांद्रे पाठोपाठ दिंडोशीमध्येही बंडखोरी पाहायला मिळणार आहे. संजय निरुपम यांना दिंडोशीतून तिकीट दिल्यानं स्थानिक शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. वैभव भराडकर बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वैभव भराडकर यांच्याकडे शिवसेनेच्या विधानसभा समन्वयक प्रमुखाची जबाबदारी होती. त्यामुळे आता महायुतीत बंडखोरीचं वादळ उठणार आहे. 


वरुण सरदेसाई आणि झिशान सिद्दिकींकडून अर्ज 


ठाकरेंच्या शिवसेनेकडून वरुण सरदेसाई आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी आपापला उमेदवारी अर्ज दाखल केला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हे वरुण सरदेसाई यांच्यासोबत उपस्थित होते. वरुण सरदेसाई यांनी बीकेसी येथील निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करण्याआधी विलेपार्ले येथील पार्लेश्वर मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी ठाकरे समर्थक शिवसैनिकांसोबत मिरवणुकीनं जाऊन अर्ज दाखल केला. झिशान सिद्दीकी यांनीही निवडणूक कार्यालयात जाण्याआधी आपल्या समर्थकांची रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलं. 2019 साली ते काँग्रेसच्या तिकीटावर वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडून आले होते. झिशान सिद्दीकी यांनी नुकताच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, ते राष्ट्रवादीच्या तिकीटावरच निवडणूक लढवत आहेत. 


दरम्यान, महाविकास आघाडीत 10 ते 12 जागांवर अजूनही तिढा कायम आहे. वर्सोवा, वांद्रे पूर्व, वडाळा, भायखळा, रामटेक, वणी, यवतमाळ आणि मिरजसह आणखी काही जागांवरही तिढा आहे. यातल्या काही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं एबी फॉर्म दिल्यानं काँग्रेसचे दिल्लीतले नेते नाराज असल्याची माहिती आहे.