Nashik Municipal Corporation Election: नाशिक महापालिका निवडणुकीसाठी अभूतपूर्व राडा सुरुच आहे. सरसकटभाजपमध्ये आयारामांना पायघढ्या घातल्या जात असल्याने नाशिकमध्ये निष्ठावंतांनी आक्रोश केला होता. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा भाजपमध्ये अभूतपूर्व राडा पाहायला मिळाला. भाजपच्या तिकीट वाटपावरून नाशिकमध्ये थेट रस्त्यावरच थरार पाहायला मिळाला. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या गाडीचा इच्छुक उमेदवारांकडून पाठलाग केला. एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या वाहनामागे इच्छुक उमेदवार धाव घेत असल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला. या ताफ्यात आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikle) आणि आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांचाही समावेश होता. तिकीट मिळावे या मागणीसाठी इच्छुक उमेदवार थेट एबी फॉर्म असलेल्या गाडीचा पाठलाग करत असल्याने नाशिक-मुंबई महामार्गावर बराच काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

Continues below advertisement

सीमा हिरे आणि कैलास अहिरे यांच्यात वाद 

दरम्यान, हा राडा झाल्यानंतर आमदार सीमा हिरे यांच्या आणि इच्छुक उमेदवाराच्या वादाचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओत आमदार सीमा हिरे यांना उद्देशून उमेदवार रक्ताच पाणी केल्याचे सांगत असल्याचे दिसून येते. एबी फॉर्म वाटपावरून हा वाद झाला. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये एबी फॉर्म देण्यावरून कैलास अहिरे आणि आमदार सीमा हिरे यांच्यात बाचाबाची झाली. कैलास अहिरे यांनी एबी फॉर्म दिलेला असतानाही आमदारांनी तिकीट कापण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्याने वातावरण चांगलेच तापले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेरच भाजप पदाधिकारी कैलास अहिरे आणि आमदार सीमा हिरे यांच्यात तू तू मैं मैं झाल्याचे दिसून आलं. आमदार सीमा हिरे यांच्यावर भाजप इच्छुक उमेदवाराने प्रश्नांचा भडीमार केला. 

दुसरीकडे,गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ते तिकीट मागत होते. मात्र ऐनवेळी काही नव्या आणि इतर इच्छुकांना उमेदवारी दिली जात असल्याने पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला. पंचवटी आणि नवीन सिडको परिसरातील इच्छुक उमेदवारांनी शहराध्यक्षांच्या गाडीचा पाठलाग केला. या घटनांमुळे भाजपच्या तिकीट वाटपातील गोंधळ उघड झाला असून, नाशिकची महापालिका निवडणूक सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, भाजपच्या तिकीट वाटपावरून आणखी एक वादग्रस्त बाब समोर आली आहे. कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या पुत्र रिद्धीशला भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उद्धव निमसे धोत्रे खून प्रकरणातील आरोपी असून सध्या कारागृहात आहे.  

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या