नवी दिल्ली : अभिनेते आणि भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आज अधिकृत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जड अंतकरणाने भाजपमधून बाहेर पडत असल्याचं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं. दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मी भाजप का सोडत आहे? हे सर्वांना माहित आहे, असं त्यांनी म्हटलं. काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं आधीच शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भेटही घेतली होती.
भाजपमध्ये हुकुमशाही वाढलीय
गेल्या काही महिन्यापासून शत्रुघ्न सिन्हा सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहेत. आजही काँग्रेस पक्षप्रवेशानंतर त्यांनी भाजपवर टीका केली. "भाजपचे वरिष्ठ नेते आज मार्गदर्शन मंडळात आहेत. भाजपमध्ये लोकशाहीचं रुपांतर हुकूमशाहीत झालं आहे. मी आजवर देशहिताच विचार केला आहे. माझ्या स्वत:साठी काही मागितलं नाही", असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं.
"भाजपमधील दिग्गज नेत्याना अपमान झाला आहे. आज भाजप वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी झाली आहे. मोदी सरकारमधील अनेक मंत्रीदेखील घाबरलेले आहेत. सरकारमधील सगळे निर्णय पंतप्रधान कार्यालयातून घेतले जातात", असा आरोप शत्रुघ्न सिन्हा यांनी केला.
"आज भाजपचा स्थापना दिवस आहे. आजच्याच दिवशी मी भाजपमधून बाहेर पडत आहे. याचं मला जास्त दु:ख होत आहे. मात्र आनंद या गोष्टीचा आहे की आता मला पक्षातून काढून टाकण्याच्या धमक्या मिळणार नाहीत", असा टोला शत्रुघ्न सिन्हा यांना लगावला.
पटना साहिबमधून निवडणूक लढणार
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पटना साहिबमधून आपण निवडणूक लढवणार असल्याचं शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा सांगितलं. महाआघाडीच्या जागावाटपानुसार पटना साहिबची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांना याठिकाणाहून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. बिहारमध्ये काँग्रेस 9 जागांवर निवडणूक लढणार आहे.
मागील निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा पटना साहिबमधून भाजपच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र पक्षविरोधी भूमिका घेतल्याने भाजपने याठिकाणी केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे.