मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटप आणि उमेदवारी निश्चितीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात मुंबईत ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. यापैकी ठाकरे घराण्याचे मातोश्री  निवासस्थान ज्या परिसरात येते त्या वांद्रे पूर्व मतदारासंघातील ठाकरे गटाचा उमेदवार ठरला आहे. 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.


ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात यासंदर्भात घोषणा केली. त्यांनी म्हटले की, काही दिवसांपूर्वी मी साहेबांना भेटलो. त्यानंतर आम्ही सगळेच पदाधिकारीही उद्धव ठाकरे यांना जाऊन भेटलो. उद्धव साहेबांनी वांद्रे पूर्व विधानसभेचे उमेदवार म्हणून वरुण सरनाईक यांचे नाव निश्चित केले आहे, असे अनिल परब यांनी सांगितले. त्यामुळे आता वांद्रे पूर्व विधानसभेत झिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. 


झिशान सिद्दीकी यांनी 2019 साली काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी अजितदादा गटात प्रवेश केला होता. त्यानंतर झिशान सिद्दीकी यांनी अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसला तरी त्यांची अजित पवार यांच्याशी जवळीक वाढली होती. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात ही जागा अजित पवार गटाच्या वाट्याला आल्यास झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी मिळू शकते. बाबा सिद्दीकी यांची नुकतीच वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे पूर्वची निवडणूक लढवल्यास त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत. 


मुंबईतील भाजपच्या 5 विद्यमान आमदारांचा पत्ता कट


भाजपकडून शुक्रवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. भाजपकडून मुंबईत भाकरी फिरवली जाणार असून सुमार कामगिरी करणाऱ्या पाच विद्यमान आमदारांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये घाटकोपर पश्चिम मतदारसंघाचे आमदार राम कदम, वर्सोवा मतदारसंघातील भारती लव्हेकर, सायन विधानसभा मतदारसंघातील तमिल सेल्वन , घाटकोपर पूर्व मतदारसंघातील पराग शाह आणि बोरिवली विधानसभा मतदारसंघातील आमदार सुनील राणे यांचा समावेश आहे.


आणखी वाचा


धनंजय मुंडेविरोधात शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, परळी मतदारसंघात भगवान सेनेचे फुलचंद कराड रिंगणात?