मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाजपकडून (BJP) मुंबईत भाकरी फिरवली जाणार असून अनेक विद्यमान उमेदवारांना तिकीट नाकारले जाण्याची शक्यता आहे. यापैकी सर्वात मोठा धक्का हा भाजपचे घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील आमदार राम कदम (MLA Ram Kadam) यांना बसणार आहे. सुमार कामगिरीमुळे राम कदम यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. राम कदम हा भाजपचा प्रसारमाध्यमांवर सातत्याने झळकणारा चेहरा होता. मात्र, सुमार कामगिरीचे कारण देत भाजप नेतृत्त्वाकडून त्यांना यंदा उमेदवारी दिली जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राम कदम यांच्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा हे पिछाडीवर पडले होते. 


राम कदम हे 2009 साली राज ठाकरे यांच्या मनसेकडून निवडणूक लढवून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर 2014मध्ये  राम कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2014 आणि 2019 मध्ये राम कदम सहजपणे निवडून आले होते. दहीहंडी, रक्षाबंधन सोहळा आणि धार्मिक स्थळांच्या यात्रांमुळे राम कदम हे सातत्याने चर्चेत असायचे. मात्र, गेल्या पाच वर्षांमधील त्यांची कामगिरी सुमार असल्यामुळे आणि त्यांची निवडून येण्याची शक्यता कमी असल्यामुळे भाजप नेतृत्त्वाकडून राम कदम यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. 


एरवी राम कदम हे त्यांच्या मतदारसंघात कोणत्या ना कोणत्या उपक्रमाच्यानिमित्ताने सक्रिय असतात. मात्र, विधानसभा निवडणूक जवळ येऊनही गेल्या काही दिवसांपासून राम कदम हे मतदारसंघात फारसे सक्रिय दिसले नव्हते. त्यामुळे अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. मात्र, आता त्याचे खरे कारण समोर येताना दिसत आहे. राम कदम यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यास घाटकोपर पश्चिम मतदारसंघात महायुतीकडून कोण रिंगणात उतरणार, याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.


भाजपकडून मुंबईतील 5 आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता


भाजपकडून मुंबईत राम कदम यांच्यासह पाच आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. या माध्यमातून भाजपच्या जुन्या नेत्यांचे विधानसभेत पुनर्वसन केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. वर्सोवा विधानसभेत विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांच्याऐवजी संजय पाण्डेय यांना उमेदवारी मिळू शकते. तर घाटकोपरमध्ये राम कदम यांचा पत्ता कट झाल्यास महायुतीचा चेहरा कोण असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर सायन मतदारसंघात कॅप्टन तमिल सेल्वन यांच्याऐवजी राजश्री शिरवडकर यांना संधी मिळू शकते. घाटकोपर पूर्व मतदारसंघात पराग शहा यांच्याऐवजी प्रकाश मेहता यांना पुन्हा संधी मिळू शकते. तर बोरिवली मतदारसंघात सुनील राणे यांच्याऐवजी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.


भाजपाचे  रेड झोनमध्ये असलेले विद्यमान आमदार ?


वर्सोवा - भारती लव्हेकर 


घाटकोपर पश्चिम - राम कदम 


सायन - तमिल सेल्वन 


घाटकोपर  पूर्व - पराग शाहा  


बोरिवली -  सुनिल राणे


आणखी वाचा


मोठी बातमी : IRS समीर वानखेडे विधानसभा लढवणार, पक्षही ठरला!