Uttamrao Jankar Met Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यापासून माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी हे गाव राज्यात नाही तर देशभरात चर्चेत आलं आहे. ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केलेल्या मारकडवाडी गावाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, याच मुद्यावरून आता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी थेट मारकडवाडी गाठत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पावारांची (Sharad Pawar) दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीचा तपशील सांगत उत्तमराव जानकर यांनी या विषयी भाष्य केलंय. 


EVM प्रकरणात पुढची दिशा काय? म्हणाले..


यावेळी बोलताना उत्तमराव जानकर म्हणाले की, आज आमची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. राज्यात संशयाचं वातावरण घोंगावत आहे. त्या अनुषंगाने शरद पवार यांनी आमची मतं जाणून घेतली. लाखाचा फरक पडत असेल तर मी माझा राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी माझी मागणी आहे. दरम्यान, या विषयी आज रात्री बैठक होऊन आम्ही पुढील दिशा ठरवू. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या ऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारकडवाडी इथे जावं. तिथे पवार, मोहिते पाटील यांना शिव्या घालण्यासाठी हे जात आहेत. तिथे आमचे गुंड असतील तर सरकारने पोलीस का तिथे घातले?लपवाछपवी करून काही होत नाही. आमच्या गावाचे मत कुठे गेले हे तेथील लोकांना समजल पाहिजे. परिणामी या संदर्भात बाळासाहेब थोरात हे राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. ते देखील येणार आहेत, मात्र ते  कधी येतील याचा निर्णय लवकरच समजेल, असेही उत्तमराव जानकर म्हणाले आहे. 


माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान करण्यात यावे यासाठी या गावाने 29 नोव्हेंबर पासून आंदोलनाला सुरुवात केली होती. मारकडवाडी येथे विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानामध्ये शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांना गावात कमी मते मिळाल्याचे समोर आले. यावर जानकर गटाने आक्षेप घेतला होता. याचवेळी विरोधी भाजपच्या समर्थक ग्रामस्थांनी या बॅलेट वरील मतदानावर बहिष्कार टाकल्याने याबाबत गावात उघड दोन गट पडले, त्यानंतर मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर व्हावी, अशा मागणी केली जाऊ लागली. गावात मोठ्या घडामोडी घडल्या, नुकतेच या गावात शरद पवार या देखील येऊन गेलेत. त्यांच्या जाण्याने सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली, तर या गावात जास्त मते मिळालेले भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी वेळोवेळी हल्लाबोल केला आहे.


मारकडवाडीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती सामना 


अशातच, शरद पवार यांच्या सभेनंतर आज भाजपकडून महाविकास आघाडीच्या फेक नरेटीव विरुद्ध जाहीर सभेचे आयोजन केल्या असून भाजपकडूनही मारकडवाडी गावात जोरदार तयारी करण्यात आली आहे. आज आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह राम सातपुते यांची ही जाहीर सभा होत आहे. गावातील तणावाची परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहे . या छोट्याशा गावात सध्या शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजी करण्यात आली असून आज भाजपच्या सभेनंतर दुपारी तीन वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही गावात पोहोचणार आहेत. त्यामुळे आज महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीचे नेते येणार असल्याने दोन्ही गटाची लोक आपले शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. '


हे ही वाचा