सातारा : माझ्या आयुष्यातील 15 वर्ष मी घालवले. लोकांना पदं मिळतात, मी काहीच न घेता काम केलं. सत्ता असताना १५ वर्षात मी कुठली फाईल घेऊन गेलो तर ती फाईल डस्टबिनमध्ये जायची, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर केली आहे. ते साताऱ्यात महाजनादेश यात्रेच्या सभेत बोलत होते. सत्तेच्या काळात माझी कामं नाहीत केली तरी राष्ट्रवादीने मला किमान सहनशीलतेचा तरी पुरस्कार द्यायला हवा होता, असेही ते म्हणाले. जर यांनी आत्मपरीक्षण केलं असतं  तर आत्मक्लेश करण्याची गरज लागली नसती, असेही उदयनराजे म्हणाले.


यावेळी ते म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत मला मागील वेळेपेक्षा जास्त मताधिक्य मिळायचं. मात्र यावेळी मताधिक्य कमी झालं. यामुळे नैतिकदृष्ट्या मी हरलो. मी ऐटीत सांगायचो 'एक बार मैने कमिटमेंट कर दी, तो मै अपने आप की भी नही सुनता' मात्र कामाच्या बाबतीत निराशाच आली, असेही ते यावेळी म्हणाले.

सत्तेत असताना एक रुपयाचं काम झालं नाही. अक्षरशः भांडावं लागायचं. मात्र आज काही न करता काम होत आहेत. सातारा शहरात विरोधी खासदार असून 680 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस दिले. 15 हजार कोटींची कामं जिल्ह्यात केली, अशा शब्दात भाजप सरकारचं  कौतुक देखील त्यांनी केलं.

यावेळी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, साताऱ्यात मेडिकल कॉलेजची गरज होती. मात्र साताऱ्याचे सुपुत्र मुख्यमंत्री असताना काम झाली नाहीत. घोंगडं भिजत ठेवून फक्त घोषणा केल्या. मी आयआयटी साताराचा प्रस्ताव मी दिला होता. ते पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित होते. त्यावेली मला उत्तर जिल्ह्यात जागा कुठं आहे? असा सवाल केला. मी जिल्हाधिकाऱ्यांकडून जागांची यादी घेऊन अनेकदा त्यांच्याकडे गेलो. मात्र त्यांच्या पेनमधील शाई संपली होती, त्यांना मी पेन देखील भेट दिला. अनेक प्रश्न घेऊन गेलो मात्र त्यावर कधीच तोडगा निघाला नाही, असेही ते म्हणाले.

नेतृत्व करत असताना लोकांच्या काही अपेक्षा असतात. लोकप्रतिनिधींकडून मूलभूत गरजा मार्गी लागाव्या अशी लोकांची अपेक्षा असते. गेली 15 वर्ष केवळ मला उमेदवारी देण्याचं काम केलं गेलं. माझा बँड वाजविण्याचा काम यांनी केलं. मी पण हुशार आहे. माझा बँड दुसरं कुणी वाजवू शकत नाही. माझं बँड मीच वाजवू शकतो. मी बॅण्डमास्टर आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी ईव्हीएमच्या विषयावर बोलताना ते म्हणाले की, मला वाटलेलं एकतर्फी कसं काय चाललंय. मग मी विचार केला का? मग मी स्वतःपासून सुरुवात केली. जर या सरकारने लोकांची कामं मार्गी लावली असतील तर लोकं कामं करणाऱ्या लोकांनाच मत देतील. ईव्हीएमच्या मुद्दा मला खटकत होता. त्यावर मला उत्तर मिळालं आहे, असेही ते म्हणाले.