Uddhav Thackeray  On Lok Sabha Election Results : मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांचा निसटता पराभव झाला. या पराभवावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमोलचा पराभव झाला नसून आपण त्याला आव्हान देणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 


शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी बोलताना उद्धव यांनी अमोल किर्तीकरच्या निकालाला आव्हान देणार असल्याचे म्हटले. उद्धव यांनी म्हटले की, सर्वसामान्य माणसानं सर्वसामान्य माणसाची ताकद काय ते दाखवून दिले आहे.  मस्तवालपणा दाखवणाऱ्यांचे काय होणार हे जनतेनंच दाखवून दिले असल्याची प्रतिक्रिया ठाकरे यांनी निकालावर दिली. वायव्य मुंबईत अमोल किर्तीकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत. त्यांचा पराभव अद्याप झाला नसल्याचेही सूचक वक्तव्य ठाकरे यांनी केले.


रविंद्र वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. याआधी अमोल किर्तीकर 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली.  


मतमोजणीत नाट्य...


मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) उमेदवार अमोल किर्तीकर यांनी शिवसेना शिंदे (Shiv Sena Shinde Group) गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांचा अवघ्या 681 मतांनी पराभव केला. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) आणि शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यात पहिल्या फेरीपासून जोरदार चुरस होती. अमोल किर्तीकर यांचा 2424 मतांनी विजय झाल्याचे जाहीर झाल्यानंतर रविंद्र वायकर यांनी फेर मतमोजणी करण्याची मागणी केली. त्यानंतर किर्तीकर हे अवघ्या 681 मतांनी विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली होती. 


किर्तीकर यांना विजयी घोषित करण्यात आल्यानंतर वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर पुन्हा मतांची मोजणी करण्यात आली. ईव्हीएम मतांमध्ये अमोल किर्तीकर यांना 4 लाख 995 मते होती. तर रवींद्र वायकर यांना 4 लाख 994 मते होती. ईव्हीएममध्ये वायकरांना अवघे एकच मत अधिक होते. त्यानंतर 3049 पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये अमोल किर्तीकर यांना 1500 आणि रविंद्र वायकर यांना 1549 मते मिळाली.