मुंबई : खरा मित्र तोच जो चुका दाखवून देतो, असं सांगत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अजूनही आपली मैत्री कायम असल्याचं सूचक वक्तव्य केलं. एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये (Coffee With Kaushik) उद्धव ठाकरेंना एकेकाळी असलेल्या फडणवीसांशी मैत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भूतकाळ कशाला म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांशी असलेल्या मैत्रीवर जोर दिला. खऱ्या मित्रासारखं फडणवीसांच्या चुका दाखवत राहणार, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "मराठी मतं फोडायला भाजपला शाह सेना तयार करावी लागली. शिंदेंना त्यांनी फोडला. मुंबई किती खाल्ली? 92 हजार कोटींच्या ठेवी यांनी मोडल्या. 3 लाख कोटींचा घोटाळा यांनी केला. गणेश नाईक म्हणतात नवी मुंबईच्या महापलिका ठेवी यांनी मोडल्या, मोठा घोटाळा केला. मुंबईच्या ठेवी चाटायच्या आहेत का असं म्हणणारे फडणवीस त्यावर उत्तर देणार का?"
Uddhav Thackeray Podcast : मराठी लोकांना त्रास देणाऱ्यांविरोधात लढा
आमचा लढा हा मराठी विरुद्ध अमराठी नाही, तर मराठी लोकांना त्रास देणाऱ्यांच्या विरोधात असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठी माणसाला घरं नाकारणारे बिल्डर लोक यांचे पालकमंत्री आहेत, त्यांच्याविरोधात हा लढा असल्याचं ठाकरे म्हणाले. तुम्ही एखाद्याच्या आहारावरून घर नाकारणार असाल तर लोकशाही कुठे आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.
जेव्हा मुंबईला देवेंद्र फडणवीस हे माहिती नव्हते, त्यावेळी कोस्टल रोडची संकल्पना आम्ही सुरू केली. आता त्याचं श्रेय ते घेतात अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ज्यावेळी मुंबईत कोणतीही आपत्ती येते त्यावेळी पहिला धावून जाणारा मुंबईकर असतो, त्यावेळी हे एफडी चोर कुठेही नसतात. मुंबईत कोरोनाच्या वेळी आम्ही काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. तर भाजपने नुसता गोंधळ घातला. भाजप शासित राज्यांमध्ये प्रेतांचा खच दिसून आला अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "शिवसेना नसती तर यांना मंत्रालय दिसलं असता का? मिंधे मराठी नाहीत का? यांना मंत्रिपद कुणी दिलं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा कुणाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले होते? मोदी कोणाच्या पाठिंब्याने पंतप्रधान झाले?"
Uddhav Thackeray Interview : राष्ट्रवादीचा निर्णय पवार साहेबांचा
राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका निवडणुकीत काका आणि पुतणे एकत्र आले आहेत. अशातच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलं. भाजपला सोडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्ही त्यांच्यासोबत राहू शकतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यासोबतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपसोबत जाणार असतील तर तो शरद पवार यांचा निर्णय असेल, असंही ठाकरे म्हणाले.
ही बातमी वाचा: