Devendra Fadnavis On Ajit Pawar: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सोमवारी सांगता झाली. आता उद्या म्हणजे मंगळवारी महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 


देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. या मुलाखतीमध्ये अजित पवार एका वेगळ्या विचारधारेचे आहेत. सध्या ते तुमच्यासोबत महायुतीमध्ये आहेत, हे तुम्हाला चालतं. पण तिकडे उद्धव ठाकरे एक वेगळ्या विचारधारेचे आहेत, ते काँग्रेससोबत आहेत...म्हणून तुम्हाला चालत नाही, असं विचारण्यात आलं. यावर अजित पवार आमच्यासोबत आले, तरी आम्ही विचारधारा सोडली नाही. आम्ही हिंदुहृदयसम्राट बोलणं सोडलं नाही. पण उद्धव ठाकरेंना तिकडे हिंदुहृदयसम्राट असं बोलणं सोडावं लागलं, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. 


आमचा रंग भगवाच, अजितदादांनाही भगवे करु- देवेंद्र फडणवीस


उद्धव ठाकरे पू्र्वी माझ्या जमलेल्या तमाम हिंदु-बांधवांनो-भगिनींनो, असं म्हणायचे. पण आता माझ्या जमलेल्या बांधवांनो-भगिनींनो-मातांनो...असं म्हणतात. मग उद्धव ठाकरेंमध्ये बदल झाला ना...रंग बदलला ना...आम्ही रंग बदलला नाही. आमचा रंग भगवाच आहे. मग अजितदादा येऊदेत की कोणीही, आमचा रंग भगवाच राहणार, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासोबतच आम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा अजित पवारांना आम्ही भगवे करू, एकवेळ अजित पवार भगवे झाले नाहीत तरीही आम्ही भगवे आहोत आणि कायमच भगवे राहु, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. 


अजित पवार नरेंद्र मोदींच्या सभेला का नाही?, देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा


अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील महायुतीच्या सभेला का आले नाही, याचा खुलासा देखील देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. खुद्द पंतप्रधानांनी आम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही सगळे ( सभेला) याल तर तुमच्या सभा होऊ शकणार नाहीत. सगळ्यांनी यायची गरज नाही, प्रत्येकाने सभा वाटून घ्या, त्याप्रमाणेच आम्ही सभा वाटून घेतल्या, असं देवेंद्र फडणवीसांनी स्प्षट केलं. मोदीजींच्या सभेत राष्ट्रवादीच प्रमुख नेते, तटकरे, भुजबळ , प्रफुल पटेल हेही होते, त्यांनी सर्वांनी भाषणही केलं, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.


संबंधित बातमी:


Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?