Maharashtra vidhansabha Results मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे महायुतीला मिळालेल्या जागा आणि संख्याबळ पाहता महायुतीमधील अनेक नेत्यांनी देखील हा निकाल आनंद देणार आहे, पण एवढा मोठा होईल, याची अपेक्षा नव्हती असे म्हटले. या निकालावर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल हा अनाकलनीय अनपेक्षित आहे. मला पटला नाही, तरी हा निकाल लागला आहे. आज लाटेपेक्षा त्सुनामी आली असा हा निकाल आहे. सर्वसामान्य जनतेला हा निकाल पटला आहे का?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
विरोधी पक्षांना शिल्लक ठेवायचं नाही, वन पार्टी वन नेशन भाजपला करायचा आहे, हे जे पी नड्डा म्हणाले होते, एका पक्षाचं सरकार येईल,असंही त्यांनी सांगितलं होतं. महायुतीला मतं लोकांनी प्रेमापोटी दिली की रागापोटी, असा तिरकस प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. तसेच, या त्यांच्या यशाचं गुपित शोधावं लागेल. जनतेला हा निकाल मान्य आहे का? जर मान्य असेल तर काही बोलणार नाही. सोयाबीनला भाव नाही, महिला असुरक्षित आहेत. त्यावेळी अस्सल भाजपचा मुख्यमंत्री होईल, असं मला वाटतं अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी निकालावर प्रतिक्रिय दिली आहे.
नक्की काही तरी गडबड आहे
कोरोनामध्ये कुटुंबप्रमुखाप्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र, हा माझ्याशी असा वागेल यावर माझा विश्वास नाही. मी महाराष्ट्राला तळमळीने सांगत होतो, पण हा महाराष्ट्र असा वागेल हे अपेक्षित नाही, नक्की काही तरी गडबड आहे : उद्धव ठाकरे