मुंबई : आज अभिषेक असता तर घोसाळकरांचं घर फोडण्याची भाजपची हिंमत झाली नसती, मला विनोद घोसाळकरांचा (Vinod Ghosalkar) अभिमान वाटतोय. पण यावेळी भावनेत अडकू नका, धनश्री कोलगेला (Dhanashree Kolge) विजयी करा असं आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं. तेजस्वीच्या विरोधात आलो नाही, तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय असंही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी दहिसरच्या शाखेला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत विनोद घोसाळकर हेदेखील उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "मला विनोद घोसाळकरचा अभिमान आहे. त्याचं घर ज्यांनी फोडलं त्यांच्या विरोधात मी इथे आलो आहे. भाजपची कुटनीती आहे, त्याच्या विरोधात आलो आहे. भाजपने घोसाळकरांच्या घरात भांडण लावून फोडाफोडी केली. आज जर अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती. अशा वृत्तीला भावनेत अडकवून बसू नका."
उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी विनोद घोसाळकर होते. आपण तेजस्वीच्या विरोधात आलो नाही, भाजपची वृत्ती ठेचायला आलो आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Tejasvee Ghosalkar News : सूनेच्या विरोधात सासऱ्याचा प्रचार
महापालिकेसाठी सर्वाधिक चर्चेत असलेल्या लढतीपैकी एक असलेल्या दहिसरमधील प्रभाग क्रमांक दोनमध्ये उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. या प्रभागात भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विरुद्ध ठाकरेंच्या धनश्री कोलगे अशी लढत आहे. धनश्री कोलगेच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि विनोद घोसाळकर आले होते.
ऐन महापालिका निवडणुकीच्या वेळी दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि विनोद घोसाळकर यांच्या सून तेजस्वी घोसाळकरांनी ठाकरेंची साथ सोडली आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेजस्वी घोसाळकरांनी भाजपने प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी दिली.
प्रभाग 2 हा ठाकरेंचे बालेकिल्ला समजला जातो. विनोद घोसाळकर यांना मानणारा मोठा वर्ग या प्रभागात आहे. अशा वेळी तेजस्वी घोसाळकरांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची खेळी भाजपने खेळली.
Dhanashree Kolge Shivsena : घोसाळकरांच्या विरोधात धनश्री कोलगे
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांच्या विरोधात ठाकरे गटाकडून धनश्री कोलगे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्यामागे ठाकरेंनी आपली सगळी ताकद लावल्याचं चित्र आहे. त्याचवेळी विनोद घोसाळकरही धनश्री कोलगे यांच्या प्रचारात उतरले आहेत.
दुसरीकडे, प्रभाग क्रमांक 7 मधून विनोद घोसाळकर यांचा मुलगा सौरभ घोसाळकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी सौरभ घोसाळकर विरुद्ध भाजपचे गणेश खाणकर अशी लढत होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी दहिसरमधील या दोन्ही प्रभागांना भेट देऊन प्रचार केल्याचं पाहायला मिळालं.
ही बातमी वाचा: