मुंबई: देशभरातील राजे-रजवाड्यांना संस्थानिक जमिनी विकण्याची परवानगी देण्याचं आमिष दाखवून भाजप त्यांना आपल्याकडे वळवत आहे. उदयनराजेही शिवकालीन संस्थानिक जमिनी विकून कोट्यवधी रूपये मिळवू इच्छितात. त्यासाठीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी केलाय. मात्र, शिवरायांच्या जमिनी विकण्याचा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर आंदोलन करून असा प्रयत्न हाणून पाडेल, असंही मलिक म्हणाले.


छ. उदयनराजे भोसले यांच्या पक्षांतराबाबत बोलताना मलिक म्हणाले की, १९९९च्या आधी उदयनराजे भाजपचे आमदार व मंत्री होते. राष्ट्रवादीनं त्यांना पराभूत केलं होत. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या आईंच्या मध्यस्थीमुळे शरद पवार त्यांना दरवेळी तिकिट देत असत. मात्र, पक्षात असूनही उदयनराजे नेहमी पक्षविरोधी भूमिका घेत. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा तर पराभव करीलच शिवाय साताऱ्यातल्या विधानसभेच्याही सर्व जागा जिंकेल, असा विश्वासही मलिकांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीत राहून साताऱ्याचा विकास करता आला नाही या उदयनराजेंच्या दाव्यावर सडकून टीका करत, 'उदयनराजेंना विकास कळत नाही. त्यांच्यात स्वत: विचार करण्याची ताकद आहे का?' असा सवाल मलिकांनी केला. उदयनराजे दिवसा काय करतात ते साताऱ्याच्या लोकांना माहित आहे. असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपनं देशभरात राजेरजवाड्यांना भाजपात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. कमाल जमीन धारणा कायद्यामुळे संस्थानिक जमीनी विकता येत नाहीत. मात्र, त्यासाठीची परवानगी देण्याचं आश्वासन भाजपनं देऊ केल्याची आमची माहिती आहे. उदयनराजेंनाही अशाच शिवकालीन जमिनी विकून कोट्यवधी रूपये मिळवायचे आहेत. मात्र, असा काही प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही मलिक यांनी दिला.

छ. उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीतील काही नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही उदयनराजेंवर टीका करताना म्हटलं की, पवार साहेबांनी आपली राजकीय तत्वे बाजूला ठेवून ज्यांच्यावर मनापासून प्रेम केलं ते म्हणजे छ. उदयनराजे भासले. कोण गेलं, कोण आलं फरक पडत नाही पण वाईट एवढंच वाटतंय ज्याच्यावर पोटाच्या पोरासारखं प्रेम केलं त्यांनी असं करायला नाही पाहिजे होतं.




हे ही वाचा:


छत्रपती-पेशव्यांच्या तुलनेचं 'ते' वक्तव्य पवारांना भोवतंय?