Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलाच तापल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलीय. मात्र, अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. काही जागांवरुन महाविकास आघाडीत तिढा कायम असल्याची माहिती मिळतेय. महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली (Sangli) आणि रामेटक (Ramtek) या दोन जागावरील तिढा कायम आहे. या दोन्ही जागांसाठी ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे. 


महाविकास आघाडीत सांगली आणि रामटेकच्या जागांवरुन तिढा कायम आहे.  सांगली आणि रामटेक या दोन्ही जागेवरती शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसनं दावा केलाय. या दोन्ही जागांवरती काल चर्चा झाली होती. मात्र, मार्ग निघाला नाही, त्यामुळं आज पुन्हा एकदा यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. 


महायुतीतही रामटेक मतदारसंघावरुन पेच कायम


महायुतीत रामटेक मतदारसंघाचा पेच कायम असतानाही शिवसेना शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे रामटेकमध्ये कामाला लागा अशा सूचना त्यांना मिळाल्या की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या जागेवर भाजपने देखील दावा केलाय. ही जागा लढवण्यासाठी भाजप इच्छुक आहे. खासदार तुमाने यांच्याकडून काल काटोल - नरखेड परिसरात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यात बोलताना लवकरच निवडणूक जाहीर होईल, पहिल्या फेरीमध्येच रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होईल त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशी सूचना केली.  विशेष म्हणजे रामटेक मतदारसंघावर भाजप आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांचा दावा असून महायुतीत रामटेक संदर्भात अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. तरी शिवसेनेने प्रचार सुरू केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एवढेच नाही तर रामटेक मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे गेल्यावरही रामटेकमध्ये उमेदवार बदलाचीही चर्चा सुरु असताना खासादर तुमाने यांनी प्रचार सुरू केल्यामुळे त्यांना एकनाथ शिंदेकडून हिरवा कंदील मिळाला आहे का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.


निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष


राजकीयदृष्ट्या आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण आज लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाची (Election Commission of India) दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


लोकसभेचं बिगुल आज वाजणार, निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार; निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडं देशाचं लक्ष