मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये एकूण 8 कोटी 85 लाख 65 हजार 547  मतदारांपैकी 5 कोटी 37 लाख 41 हजार 204 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पहिल्या टप्प्यात 7 मतदारसंघासाठी 63.04 टक्के, दुसऱ्या टप्प्यातील 10 मतदारसंघांसाठी 62.88 टक्के,  तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघांसाठी 62.36 टक्के तर चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील 17 मतदारसंघांमध्ये अंदाजे 57 टक्के मतदान झालं आहे.

महाराष्ट्रामध्ये गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे 71.98 टक्के इतके मतदान झालं आहे, तर कल्याण मतदारसंघात सर्वात कमी 44.27 टक्के मतदान झालं.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे 7 लाख 49 हजार 374 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसंच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे 1 लाख 4 हजार पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण सुमारे साडे आठ लाख कर्मचारी या  निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आले होते.

पहिल्या टप्प्यासाठी राज्यात सात मतदारसंघात १ कोटी ३० लाख ३५ हजार ३३५ मतदार होते. त्यापैकी ६३.०४ टक्के मतदान झालं म्हणजे ८२ लाख १७ हजार ६०९ मतदारांनी मतदान केले.

दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यात दहा मतदारसंघात १ कोटी ८५ लाख ४६ हजार ४७२ मतदार होते. त्यापैकी ६२.८८ टक्के मतदान झालं म्हणजे १ कोटी १६ लाख ६१ हजार ८०३ मतदारांनी आपला हक्क बजावला.

तिसऱ्या टप्प्यातील चौदा मतदारसंघातील २ कोटी ५७ लाख ८९ हजार ९४५ मतदारांपैकी ६२.३६ टक्के म्हणजेच जवळपास १ कोटी ६० लाख ८१ हजार ८५६ मतदारांनी मतदान केले आहे.

चौथ्या टप्प्यातील १७ मतदारसंघातील ३ कोटी १२ लाख मतदारांपैकी ५७ टक्के म्हणजेच १ कोटी ७७ लाख ८० हजार मतदारांनी मतदान केलं.