Sangli Municipal Corporation Election: सांगली महापालिका निवडणुकीत एकीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सर्वच्या सर्व जागा लढण्याचा इरादा व्यक्त करत सर्व जागांवर मुलाखती पूर्ण केले आहेत. दुसरीकडे काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी मिळून भाजप विरोधातही महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे. याबाबतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आज (25 डिसेंबर) काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत संध्याकाळी मीटिंग होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी मैत्रीपूर्ण लढतीवर आपला विश्वास नसून चर्चा सुरु असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता पुण्यानंतर सांगलीत सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे.
काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या संयुक्त मुलाखती
दुसरीकडे, सांगली ,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस या पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या संयुक्त मुलाखतींना सांगलीत सुरुवात झाली आहे. सांगलीमधील आमराई ऑफीसर्स क्लबमध्ये या मुलाखती घेण्यात येत आहेत. आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील मुलाखती घेत आहेत. पहिल्यांदाच काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी यांच्या संयुक्त मुलाखती सांगलीत होत आहेत. विशेष म्हणजे कोणते शक्ती प्रदर्शन न करता फक्त उमेदवारांची मुलाखत यामध्ये घेतली जात आहे.
भाजपची एकला चला रे भूमिका?
दरम्यान, सांगलीत अजित पवारांची राष्ट्रवादी तसेच शिंदे सेनेकडून अधिक जागांची मागणी केली जात असल्याने भाजप एकला चलो रे च्या भूमिकेत असल्याची सुद्धा चर्चा आहे. महायुतीमधील दोन्ही पक्षांना वगळून जनसुराज्य आणि रिपाइं सोबत घेण्याचा सुद्धा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाकडून 30 जागांची मागणी करण्यात आली आहे. शिंदे सेनेकडून 20 आणि रिपाइंकडून10 जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजप जनसुराज्य आणि रिपाइंच्या मदतीनं नशीब आजमावणार की भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादीसह भाजप एकवटणार? याची उत्सुकता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या