मुंबई : शरद पवारांचा राजकीय आणि वैचारिक वारसदार येणारा काळ ठरवेल. तो वारसदार पक्ष आणि कार्यकर्ते ठरवतील. कुठलाही राजकीय पक्ष एका कुटुंबाची मक्तेदारी नाही, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. त्या एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात बोलत होत्या. शरद पवार यांचा राजकीय आणि वैचारिक वारसदार कोण? असा प्रश्न विचारला असता त्यांनी कुठल्याही पक्षावर एका कुटुंबांची मक्तेदारी नसल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार शरद पवार ठरले. वारसदार होणे हे काही शेअर्स नाहीत. तो वारसा कुणालाही मिळू शकतो, ते काळ आणि पक्ष ठरवेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.


  महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री म्हणून प्रणिती शिंदेंना पसंती   

महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री म्हणून प्रणिती शिंदेंना पाहायला आवडेल. ती वकील आहे. खूप कष्ट करते. ग्राउंड लेव्हलवर तिचं  काम खूप चांगलं आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी  संसदेत काम करते. देशात मी प्रत्येक सेशनला मी पहिली येते. तो लोकांचा विश्वास आहे. माझा राज्याच्या राजकारणात येण्याचा विचार नाही, असेही सुळे म्हणाल्या. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, सुशीलकुमार शिंदे यांचा तो मनातला विचार होता. तो त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. मात्र असा निर्णय कुठलाही एक व्यक्ती घेऊ शकत नाही. त्यांना राष्ट्रवादीची टीम चांगली वाटतेय हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.

शरद पवार जितके जास्त लोकांमध्ये जातात तितके खुश

सध्या शरद पवार तब्येत ठीक नसताना राज्यभर दौरे आणि सभा करत आहेत. हे शरद पवार यांनाच आवडतं. त्यांना कष्ट करायला आवडतं.  दौरा असो अथवा नसो ते नेहमी फिरत असतात. जितके जास्त ते लोकांमध्ये जातात तितके ते खुश असतात. ते संघर्षाला कधीच जुमानत नाहीत, असेही सुळे म्हणाल्या.  पवारांबद्दल काहीतरी बोलावं लागतं. प्रत्येकाला नवीन काहीतरी बोलावं लागतं म्हणून टीका करतात. आमच्या कुटुंबाशिवाय दुसरं काही टीका करायला नाही आणि दुसरं काही सांगायला नाही, अशी टीका त्यांनी केली.

सुळे यावेळी म्हणाल्या की, रोहितवर टीका केली की हे बाहेरचं  पार्सल आहे. मात्र आमचा बांधाला बांध तरी आहे. हे पार्सल तर पुरात वाहत कोल्हापुरातून पुण्यात आलं आहे, अशी टीका सुळे यांनी चंद्रकांत पाटलांवर  केली. रोहित पवारांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, रोहित पवार स्वतः लढत आहे. तो खूप महिने कष्ट करत आहे, असेही त्या म्हणाल्या. नवीन लोकांनी राजकारणात यायला पाहिजे. आदित्य ठाकरे यांचेही स्वागत आहे. नव्या लोकांच्या येण्याने राजकारणात नव्या संकल्पना येतात, असेही सुळे म्हणाल्या.

अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, अजितदादा नेहमी खरं बोलतो. बाळासाहेब ठाकरेंबद्दलचा तो त्याचा अनुभव आहे. त्याला त्या मीटिंगमध्ये अनुभव आला. तो त्याने सांगितला, असे सुळे म्हणाल्या.