कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे ऋतुराज पाटील आणि भाजपचे अमल महाडिक यांच्यात लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी 'आमचं ठरलंय' असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविरोधात प्रचार केला होता. या मदतीची परतफेड म्हणून काँग्रेसला मदत करण्याची भूमिका शिवसेनेचे खासदार मंडलिक यांनी घेतली आहे. संजय मंडलिक घरोघरी जाऊन ऋतुराज पाटील यांना मत देण्याचं आवाहन करत आहेत.
घरोघरी जाऊन प्रचार
सतेज पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात ऋतुराज पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. त्यावेळी संजय मंडलिक यांनी व्यासपीठावर जाऊन ऋतुराज यांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु ते प्रचारात कुठेही दिसत नव्हते. परंतु आता ते घरोघरी जाऊन ऋतुराज यांचा प्रचार करत आहेत. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या व्हिडीओमध्ये संजय मंडलिक यांनी युतीधर्माची आठवण करुन दिली. लोकसभेवेळी अमल महाडिक यांनी युती धर्म पाळला नाही. त्यामुळे आता विधानसभेला त्याची परतफेड करण्याची संधी मिळाल्याचं मंडलिक बोलताना दिसत आहेत.
कोल्हापुरातील इतर जागांवर फटका?
युतीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना 8 तर भाजप 2 जागांवर निवडणूक लढवत आहे. संजय मंडलिक यांच्या भूमिकेचा परिणाम केवळ कोल्हापूर दक्षिणच नाही तर इतर जागांवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच "आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा युतीधर्म पाळा अन्यथा, भारतीय जनता पार्टीकडे काम घेऊन येऊ नका, असा दम चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांना दिला होता. परंतु त्यांच्या इशाऱ्याला केराची टोपली दाखवत संजय मंडलिक ऋतुराज पाटील यांचा प्रचार करत आहेत.