Sunil Tatkare Ajit Pawar NCP: महाराष्ट्रात पुढील सरकार भाजपच्याच नेतृत्वाखाली स्थापन होणार असल्याचा स्पष्ट निरोप भाजपच्या बड्या नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिला आहे. तसेच भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव निश्चित झाल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. मात्र भाजपकडून किंवा महायुतीकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रि‍पदासाठी पाठिंबा दिल्याचं देखील सांगण्यात येत आहे. याचदरम्यान आज अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. 






नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर सुनील तटकरे काय म्हणाले?


सुनील तटकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढं मोठं यश महायुतीला मिळालं. अमित शाह यांचं सातत्याने मार्गदर्शन, सहकार्य आहे. आभार व्यक्त करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भेट झाली. पंतप्रधान मोदी यांची भेट झाली. त्यांचेही आभार व्यक्त केले आणि अभिनंदन केले. राज्यातील जनतेने जे यश आम्हाला दिले त्यात मोदींचा मोठा वाटा आहे, असं सुनील तटकरे म्हणाले. अमित शाह यांच्या भेटीबाबत सुनील तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. दिल्ली येथे महायुतीचे शिल्पकार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील महायुतीच्या महाविजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी प्रफुल पटेलही सोबत उपस्थित होते, अशं सुनील तटकरे म्हणाले. विशेष म्हणजे अमित शाह यांच्याभेटीआधी सुनील तटकरे यांनी देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगला या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भेटीगाठी सुरु केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.


एकनाथ शिंदेंना निरोप-


मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचा निरोप केंद्रातून एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे, असंही सांगण्यात येत आहे.  सोबत केंद्रीय मंत्रिपदाची नाहीतर, राज्यात उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनाचे पत्र दिल्यानंतर केंद्रातून घडामोडींना वेग आला आहे.  एकनाथ शिंदे यामुळे काहीसे नाराज झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच उपमुख्यमंत्री पदाची ऑफर शिंदे स्वीकारणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


संबंधित बातमी:


Eknath Shinde: मोठी बातमी: मी बाहेरुन पाठिंबा देण्यास तयार, एकनाथ शिंदेंनी भाजपला निरोप धाडल्याची चर्चा, किती तथ्य?