आठ वेळा खासदारकी भूषवलेल्या सुमित्रा महाजन पक्षावर नाराज, निवडणूक न लढवण्याचा निर्णय
एबीपी माझा वेब टीम | 05 Apr 2019 04:05 PM (IST)
उमेदवारीसंदर्भातला संभ्रम दूर करा, मी निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा सुमित्रा महाजन यांनी एका पत्राद्वारे केली आहे. मध्य प्रदेशातल्या इंदूरमधून त्या तब्बल आठ वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत.
इंदौर : लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने इंदौरमधून अद्याप उमेदवारी जाहीर नसल्यामुळे महाजन खंतावल्या आहेत. पक्षाला उद्देशून लिहिलेल्या पत्रात सुमित्रा महाजनांनी आपली नाराजी उघड केली आहे. उमेदवारीसंदर्भातला संभ्रम दूर करा, मी निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा सुमित्रा महाजन यांनी एका पत्राद्वारे केली आहे. मध्य प्रदेशातल्या इंदूरमधून त्या तब्बल आठ वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. त्या 16 व्या लोकसभेच्या अध्यक्षा आहेत. या निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेत्यांना दूर ठेवलं आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांता कुमार, करिया मुंडा यासारख्या दिग्गज नेत्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. मुरली मनोहर जोशी यांनी काही दिवसांपूर्वी आपली नाराजी बोलून दाखवली होती, तर अडवाणींनी कालच ब्लॉगमधून भाजपमधील सद्यस्थितीवर बोट ठेवलं होतं. सुमित्रा महाजन या मूळच्या चिपळूणच्या आहेत. चिपळूण ही त्यांची जन्मभूमी, तर इंदौर ही त्यांची कर्मभूमी आहे. 1989 पासून सुमित्रा महाजन खासदार म्हणून लोकसभेवर निवडून येत आहेत.