पंढरपूर : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या विरोधात भाजपकडून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. दरम्यान शरद पवारांनी 2009 च्या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर आणि बोगस मतदान केल्याच गंभीर आरोप सुभाष देशमुखांनी केला आहे.



मात्र 2019 ची परिस्थिती बदलली असून असे कोणतेही गैरकृत्य होऊ दिले जाणार नसल्याचा इशारा सुभाष देशमुखांनी दिला आहे. माढा तालुक्याच्या भाजप कार्यकर्ता बैठकीसाठी सुभाष देशमुख आज टेंभुर्णी येथे आले होते.


शरद पवार 2009 मध्ये केंद्रात मंत्री होते, तर राज्यात त्यांच्याच पक्षाची सत्ता होती. अशावेळी लोकसभा निवडणुकीत सत्तेचा गैरवापर करुन मोठ्या प्रमाणात दडपशाही करण्यात आल्याचे देशमुखांनी सांगितले. याबाबत अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रारी करुनही काहीच उपयोग झाला नव्हता. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोगस मतदान करुन घेण्यात आलं. भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाली आणि अशा दहशतीच्या जोरावर शरद पवार यांनी 2009 चा विजय मिळविल्याचे गंभीर आरोप देशमुख यांनी केला.

यावेळी केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्याने प्रशासनाला हाताशी धरुन कोणताही गैरप्रकार घडू दिला जाणार नाही. या निवडणुकीत जनता निर्भयपणे मतदान करेल. तसेच अर्ज भरेपर्यंत शरद पवार पडतील असे बाहेर बोलू नका, अन्यथा ते अर्ज मागे घेतील, असा टोमानही देशमुखांनी लगावला.