राष्ट्रवादी काँग्रेसकडे मावळमध्ये दुसरा चेहरा नव्हता. पार्थ पवारांच्या नावाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. मात्र लोकसभेसाठी त्यांना उमेदवारी देण्याचं काही निश्चित नव्हतं. राज्यात पवार हा ब्रँड आहे आणि त्यामुळेच मावळमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याचं प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केलं. पार्थच्या नावाचा पक्षाला फायदा झाल्यास चांगलंच असेल असंही ते पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी पदाची योग्यता राखावी
गेल्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी हलक्या भाषेत प्रचार करत आहेत. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला असं बोलणं शोभत नसल्याचं प्रफुल पटेल म्हणाले. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने अशी अशोभनिय वक्तव्यं करणं चुकीचं असल्याचंही ते म्हणाले. तसंच मै भी चौकीदार ही काही पक्षाची थीम असू शकत नाही म्हणत भाजपच्या मोहीमेवरही निशाणा साधला. तसंच मोदींच्या अशा हलक्या प्रचाराचा राष्ट्रवादीला फायदाच होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तसंच यंत्रणांनी कोणतेही पुरावे दिले नसताना मोदी थेट विरोधी पक्षांवर कसा काय आरोप करतात? असा सवालही त्यांनी विचारला. पंतप्रधानांकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. हे दबावतंत्र चुकीचं असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या पाच वर्षात लोकसभा-राज्यसभेचा दर्जा खाली घसरल्याचंही ते म्हणाले.
म्हणून भंडारा-गोंदियामधून लढलो नाही
भंडारा-गोंदियामधून मी चारवेळा खासदार होतो. मात्र 2014 मध्ये मोदी लाटेमुळे आपला प्रभाव झाल्याचं प्रफुल पटेल यांनी मान्य केलं. मात्र 2018 मध्ये पोटनिवडणुकीत पुन्हा ही जागा काबीज करण्यात राष्ट्रवादीला यश आल्याचंही त्यांनी नमूद केलं. राज्यसभेतील खासदारकीची अजून सव्वातीन वर्ष शिल्लक असल्याने लोकसभेसाठी रिंगणात न उतरल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
भंडारा-गोंदियातील लोकांची इच्छा होती की मी लढावं पण केवळ राज्यसभेसाठी निवडणूक न लढवल्याचंही ते पुढे म्हणाले.
या कारणामुळे देशातील एअरलाईन्स अडचणीत
एअर इंडिया ही कंपनी केवळ इंधनाच्या दरवाढीमुळे आर्थिक अडचणीत आल्याचं प्रफुल पटेल यांनी सांगितलं. तसंच याच कारणामुळे किंगफिशर आणि जेटही तोट्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं.
2019 साली पवार पंतप्रधान व्हावे असं का वाटलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे एक अनुभवी राजकारणी आहेत. त्यामुळे ते पंतप्रधान व्हावेत असं बोलल्याचंही प्रफुल पटेल यांनी सांगितलं.
खासदार निधी खर्च करतोच, विरोधकांचा आरोप चुकीचा
राज्यसभेत गेल्यावर मिळालेला खासदार निधी खर्च करतो. त्यामुळे खासदार निधी खर्च होत नसल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा असल्याचं प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केलं. त्यातील काही निधी पक्षासाठीही द्यावा लागतो असंही ते पुढे म्हणाले.