पणजी : माजी सरंक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांनी शरद पवारांना पत्र लिहिलं आहे. राजकीय लाभासाठी माझ्या वडिलांच्या नावाचा वापर करुन खोटं बोलून नका, असं उत्पल पर्रिकर यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.


तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर हे राफेल कराराशी सहमत नव्हते, म्हणून त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. शरद पवारांच्या याच वक्तव्यावरुन उत्पल पर्रिकर यांनी राजकीय लाभासाठी खोटी माहिती पसरवू नका, असं म्हटलं आहे.


माझे वडील हयात नसल्यानेच तुम्ही असं बोलता, पवारसाहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुमचं वक्तव्य ऐकूण आपल्याला अत्यंत दु:ख झाल्याचंही उत्पल यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.


उत्पल मनोहर पर्रिकर यांचं पत्र


माझे वडील श्री मनोहर पर्रिकर यांच्याविषयीचे आपले विधान वाचून मला आणि माझ्या कटुंबाला अपार दुःख झाले. राजकीय फायद्यासाठी धादांत असत्य पसरविण्याच्या इराद्याने माझ्या वडिलांचे नाव वापरण्याचा हा आणखी एक दुर्दैवी आणि असंवेदनशील प्रयत्न आहे.


माझे वडील हयात असताना आणि धैर्याने आजाराचा सामना करत असताना काही राजकीय नेत्यांनी त्यांचे नाव क्षुद्र राजकारणासाठी वापरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्या वडिलांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. पण आता ते आपल्यामध्ये नसल्यामुळेच कदाचित तुम्ही त्यांचे नाव घेऊन खोटे बोलण्याचे स्वातंत्र्य घेत आहात. एक ज्येष्ठ आणि सन्मानित राजकारणी म्हणून भारतातल्या जनतेला पवार साहेबांकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती.


राफेल खरेदी व्यवहारामुळे मनोहर पर्रिकर संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून परतले असे खोटारडेपणाने सुचविणे हा मनोहर पर्रिकर व गोव्याच्या जनतेचा अपमान आहे. माझे वडील आजाराचा सामना करत असताना ज्यांनी चौकशी करायचीही तसदी घेतली नाही त्यांनी राजकीय चिखलफेकीसाठी त्यांचे नाव घेण्यास सुरुवात करावी हे दुःखदायक आहे.


आपण विधान केलेच आहे तर मला काही मूलभूत बाबी सांगू दे. माझे वडील एक अत्यंत प्रामाणिक व निस्पृह व्यक्ती होते, ज्यांनी गोव्यात असो नाही तर दिल्लीत, देशाच्या सर्वोच्च हितासाठीच काम केले. श्री पर्रिकर संरक्षणमंत्री म्हणून काम करण्यास दिल्लीला गेले आणि त्यांनी सर्वार्थाने उत्तम काम केले. त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले व त्यासाठी त्यांचे सदैव स्मरण केले जाईल. त्यापैकीच एक निर्णय राफेल विमानखरेदीचा होता. ते या निर्णयाचे मुख्य शिल्पकार होते. नंतर जेव्हा गोव्याच्या जनतेला ते त्यांच्या सेवेसाठी परत हवे होते, त्यावेळी श्री पर्रिकर कर्तव्यबुद्धीने परतले आणि त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत गोव्याची सेवा केली.


एक माजी संरक्षणमंत्री म्हणून आपल्या शूर सैनिकांना शस्त्रसज्ज करण्याचे किती महत्त्व आहे, हे आपण जाणत असाल याची मला खात्री आहे. आपल्या सशस्त्र दलांना बळकटी देण्याच्या प्रयत्नात अडथळा आणण्यासाठी खोडसाळ अपप्रचार मोहीम सुरू असून आपणही त्याचे भाग झालात, हे क्लेषकारक आहे.